पशुवैद्यकीय दवाखानेही सहभागी
By Admin | Updated: November 7, 2014 23:32 IST2014-11-07T22:14:18+5:302014-11-07T23:32:20+5:30
सुभाष म्हस्के : स्वच्छ भारत अभियानाला प्रारंभ

पशुवैद्यकीय दवाखानेही सहभागी
रत्नागिरी : जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या ग्रामीण भागातील ७२ पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पशुसवंर्धन समितीचे सभापती व उपाध्यक्ष सतीश शेवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. सी. म्हस्के यांनी दिली.
स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच कार्यालयांमध्ये स्वच्छता व सुशोभिकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. याचा शुभारंभ आजपासून करण्यात आला. हे अभियान आजपासून २० नोव्हेंबरपर्यंत पंधवड्यात राबविण्यात येत आहे. परिषद भवनातील तिन्ही मजल्यावरील सर्वच विभागामध्ये स्वच्छता अभियानामध्ये अधिकारी व कर्मचारी गुरुवारी सुटीच्या दिवशीही सहभागी झाले होते. जिल्हा परिषद , पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या सदस्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये अंतर्गत भाग स्वच्छतेला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. या अभियानांतर्गत औषधांची मुदत तपासणी, पुरवठा केलेल्या औषधांची मुदतबाह्य दिनांक तपासणी करण्यात आली. वापरलेल्या बाटल्यांची निरुपयोगी साहित्यांची विल्हेवाट लावण्यात आली.
दि. ८ नोव्हेंबर रोजी वर्गीकरण करण्यात आलेल्या अभिलेखांचे गठ्ठे कापडात बांधणे, कार्यालयातील आवश्यक तांत्रिक तक्ते लावणे, अ, ब, क, ड तक्ते अद्ययावत करणे, पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ करणे, निर्जंतुकीकरण करणे, इमातीचा तळ, फरशी, भिंत स्वच्छ करणे.
दिनांक ९ रोजी पशुपालकांच्या सहाय्याने दवाखान्यांना रंगरंगोटी करणे, इमारतीचे दरवाजे स्वच्छ करणे, रॅक स्वच्छ करणे, फलक अद्ययावत करणे, खोडा स्वच्छ करणे, नागरिकांची सनद प्रथमदर्शनी लावणे, दवाखान्यांचे अभिलेख व्यवस्थित ठेवणे.
दि. १० रोजी कृत्रिम रेतनाच्या भांड्याला गोणपाट लावणे, द्रवनत्र व वीर्यमात्राचे सर्व कंटेनर लाकडी फळीवर ठेवणे, कृत्रिम रेतनासाठी साहित्याचा संच एकत्रित तयार करुन ठेवणे.
दि. ११ रोजी मागील तीन वर्षांचे योजनांचे पाठपुरावा अहवाल अद्ययावत करणे, माहिती पुस्तिका अद्ययावत करणे, ग्राहक संतुष्टता नोंदवही तयार करणे, गोचिड-गोमाशा प्रात्यक्षिक दाखविणे. या अभियानाच्या कालावधीत एकत्रित केलेल्या यशोगाथा सादर करणे आदी कामे या अभियानाच्या कालावधीत करण्यात येणार आहेत.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये हे अभियान उत्कृष्ठपणे राबविता येईल राबविता येईल यासाठी शेवडे यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ग्रामीण भागात काम करणारे पशुसंवर्धन विभागातील सर्वच अधिकारी, कर्मचारी काम करीत आहेत. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदिश राजापकर व मुख्यकार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांचेही मार्गदर्शन लाभले असल्याचे डॉ. म्हस्के यांनी सांगितले.(शहर वार्ताहर)
करू या जिल्हा स्वच्छ...
रत्नागिरी तालुक्यातील १० पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या भिंती, दरवाजे स्वच्छ करण्यात येत असून, रंगरंगोटीची कामेही हाती घेण्यात आल्याचे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित कसालकर यांनी सांगितले. सर्वत्र हे अभियान उत्स्फूर्तपणे राबवले जाणार आहे.