चिपळूण : तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून, वाशिष्ठी नदीची पाणी पातळी ५ः२२ मीटर म्हणजेच इशारा पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, सकाळी ९:५० वाजता भरती असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
सध्या कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी १३३.५० मीटर आहे. कोळकेवाडी धरणाच्या परिसरात सोमवारी सकाळी ८ पासून आज सकाळी ८ वाजेपर्यंत म्हणजे २४ तासामध्ये २२० मिमी पाऊस पडला आहे. आज सकाळी ८ ते ८ः३० यावेळेत १५ मिमी पाऊस पडलेला आहे. सर्व मशीन बंद केलेल्या आहेत. सकाळी ९ः५० वाजता भरती असल्याने पुढील दीड तास महत्त्वाचा आहे.
पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याने ११ ठिकाणी नगरपालिका, महसूल, पोलिस व एनडीआरएफ यांची पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. तसेच ५ ठिकाणी बोटी ठेवण्यात आलेल्या आहेत.
नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.