केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाची केली हवाई पाहणी
By मनोज मुळ्ये | Updated: March 30, 2023 13:04 IST2023-03-30T12:45:14+5:302023-03-30T13:04:58+5:30
अजूनही बरेच काम बाकी असल्याने मंत्री गडकरी यांनी केलेली पाहणी महत्त्वपूर्ण ठरणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाची केली हवाई पाहणी
रत्नागिरी : ज्यांच्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण प्रत्यक्षात येत आहे, त्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज, गुरुवारी या कामाची हवाई पाहणी केली.
रायगडमधील कार्यक्रम आटोपून ते रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथे जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानमधील महाविद्यालयाच्या भूमिपूजनासाठी आले आहेत. त्यांच्यासोबत उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हेही उपस्थित आहेत. येताना मंत्री गडकरी यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ची पाहणी केली. केवळ त्यांच्या पुढाकारामुळे या कामासाठी १५ हजार कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर झाला आणि चौपदरीकरणाच्या अनेक वर्षे रखडलेल्या मागणीला हिरवा कंदिल मिळाला.
मंजुरीनंतरही भूसंपादन, मोबदला विलंब, वन्य जमिनीच्या मंजुरीला झालेला विलंब, बदललेले ठेकेदार अशा अनेक कारणांमुळे हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. आता त्यात प्रगती होत आहे. मात्र अजूनही बरेच काम बाकी असल्याने मंत्री गडकरी यांनी केलेली पाहणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.