Ratnagiri: मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामांवर गदा, मत्स्य व्यवसाय विभागाने बजावली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:30 IST2025-01-14T17:29:12+5:302025-01-14T17:30:47+5:30
रत्नागिरी : मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी दुसऱ्या टप्प्याच्या कामात अडथळा येऊ नये, यासाठी तेथील अनधिकृत बांधकामे त्वरित हटविण्यात यावीत, अशा ...

Ratnagiri: मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामांवर गदा, मत्स्य व्यवसाय विभागाने बजावली नोटीस
रत्नागिरी : मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी दुसऱ्या टप्प्याच्या कामात अडथळा येऊ नये, यासाठी तेथील अनधिकृत बांधकामे त्वरित हटविण्यात यावीत, अशा नोटीस मत्स्य व्यसाय विभागाकडून संबंधितांना बजावण्यात आली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांची धावपळ करण्यात आली आहे.
मिरकरवाडा बंदराच्या ११ हेक्टर जागेवर कोट्यवधी रुपये खर्च करून हे बंदर विकसित करण्यात येत आहे. या बंदरामध्ये ३०० ट्रॉलर्स आणि २०० पर्ससीन नौका, अशा एकूण ५०० नौका उभ्या राहतील, असे सुसज्ज बंदर येथे उभारण्यात येणार आहे. हे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. शासनाने त्यासाठी निधीही मंजूर केला आहे. याकरिता बंदरातील जागा मोकळी करून देणे आवश्यक आहे.
मिरकरवाडा बंदरात ३०० अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत. या अनधिकृत बांधकामांमध्ये माशांची जाळी, नौकांचे इतर सामान, सुके मासे, खारवून ठेवलेले मासे ठेवले जातात, तसेच माशांची खरेदी-विक्री येथूनच करण्यात येते. गेल्या कित्येक वर्षांपासून ही बांधकामे उभारण्यात आली असून, मत्स्य विभागाकडून अनेकदा नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून ती बांधकामे ‘जैसे थे’ आहेत. मिरकरवाडा बंदराच्या विकासाचा टप्पा-२ चे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ही अनधिकृत बांधकामे हटविण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
नौका दुरुस्ती, लिलावगृह, मच्छीमारांना विश्रांतीसाठी शेड, जाळी विणण्यासाठी शेड, अंतर्गत रस्ते, नौका दुरुस्ती सुविधा, उपाहारगृह, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, सुरक्षारक्षक चौकी, अशी विविध कामे या दुसऱ्या टप्प्यांतर्गत प्रस्तावित करण्यात आली आहेत.
मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामांना अनेकदा नोटीस बजावण्यात आली होती. त्याचबरोबर ऑक्टोबर, २०२३ मध्ये मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली होती. ही कारवाई मत्स्य विभाग, नगर परिषद यांच्याकडून पोलिस संरक्षणात करण्यात आली होती. या कारवाईनंतर पुन्हा पक्की व कच्ची अनधिकृत बांधकामे पुन्हा त्याच जागेवर उभी करण्यात आली आहेत.