शिवसेनेचे दोन्ही गट एकाच शाखेतून कारभार करणार, कोकणात दिसतंय अजब चित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 18:03 IST2025-01-30T17:57:14+5:302025-01-30T18:03:38+5:30
रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील शिवसेना शाखेतून शिंदेसेना कारभार करणार की उद्धवसेना, याची चर्चा राजकीय गोटात सुरू होती. ...

शिवसेनेचे दोन्ही गट एकाच शाखेतून कारभार करणार, कोकणात दिसतंय अजब चित्र
रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील शिवसेना शाखेतून शिंदेसेना कारभार करणार की उद्धवसेना, याची चर्चा राजकीय गोटात सुरू होती. मात्र, माजी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी उद्धवसेनेचे नूतन तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोघांनीही आमच्यामध्ये कोणताही वाद नाही आणि दोघेही या शाखेतूनच काम करणार असल्याचे जाहीर केले.
उद्धवसेनेचे माजी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी विभागप्रमुखांसह शिंदेसेनेमध्ये प्रवेश केला. साळवी यांच्या पक्षांतरानंतर उद्धवसेनेने उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांची तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याची घोषणा केली.
पक्षप्रवेशानंतर साळवी स्टॉप येथील शिवसेना शाखा उद्धवसेनेकडे राहणार की शिंदेसेना ती ताब्यात घेणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यावरून वाद आणि शक्तिप्रदर्शन हाेणार, अशा चर्चा रंगल्या. मात्र, प्रत्यक्षात काहीच घडले नाही.
साळवी आणि घोसाळे या दोघांनीही आमच्यामध्ये कोणताही वाद नाही. यापुढेही वाद होणार नसल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यामुळे दोन्ही शिवसेना एकाच शाखेतून काम करणार आहेत. यावेळी उद्धवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.