Ratnagiri: मुचकुंदी नदीत दोघे वाहून गेले; एक बचावला, दुसऱ्याचा शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 17:44 IST2025-08-30T17:44:13+5:302025-08-30T17:44:37+5:30
खेडपाठोपाठ लांजात दुर्घटना

Ratnagiri: मुचकुंदी नदीत दोघे वाहून गेले; एक बचावला, दुसऱ्याचा शोध सुरु
लांजा : मुचकुंदी नदीतून पलीकडे देवदर्शनासाठी जात असताना प्रभानवल्ली येथील दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान घडली. यातील एकजण बचावला असून, दुसऱ्याचा शोध अजून सुरू आहे.
प्रभानवल्ली गोसावीवाडी येथील मिलिंद विजय खेगडे (वय २८) व केतन श्रीपत खेगडे (वय ३५) हे दोघेजण मुचकुंदी नदीतून दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान पलीकडे असलेल्या मंदिरात दर्शनासाठी जात होते. मात्र नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने जोरदार प्रवाहात ते वाहून गेले. यातील मिलिंद विजय खेगडे यांचे दैव बलवत्तर म्हणून ते वाहत असताना बालंबाल बचावले. मात्र केतन खेगडे हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
लांजा पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, तहसीलदार प्रियांका ढोले यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत. दोन दिवस थोडीशी उघडीप दिल्यानंतर शुक्रवारी पावसाचा जोर वाढला होता. या पावसामुळे तालुक्यातील पाचही नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.
खेडपाठोपाठ लांजात दुर्घटना
दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाप्रसंगी खेड तालुक्यात भोस्ते येथील मंगेश पाटील हा तरुण बुडाला होता. त्याचा मृतदेह तब्बल २२ तासांनी हाती आला. यापाठोपाठ आता लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथे ही घटना घडली आहे. पाण्यात बेपत्ता झालेल्या केतन खेगडे सुखरुप सापडू दे, अशी प्रार्थना लोक करत आहेत.