चिपळूणच्या पाणथळीत अवतरला दुर्मिळ ‘ब्लॅक हेरॉन’!, भारतात प्रथमच नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:36 IST2025-08-07T13:34:49+5:302025-08-07T13:36:42+5:30

डॉ. श्रीधर जोशी यांच्या निरीक्षणातून समोर आली भारतातील पहिली नोंद

Two unique African birds of the Black Heron genus were spotted in the wetlands of Chiplun | चिपळूणच्या पाणथळीत अवतरला दुर्मिळ ‘ब्लॅक हेरॉन’!, भारतात प्रथमच नोंद

चिपळूणच्या पाणथळीत अवतरला दुर्मिळ ‘ब्लॅक हेरॉन’!, भारतात प्रथमच नोंद

चिपळूण : चिपळूणच्या पाणथळ परिसरात नुकतेच ब्लॅक हेरॉन अर्थातच काळे बगळे जातीचे दोन अद्वितीय आफ्रिकन पक्षी दिसले. चिपळुणातील पक्षिनिरीक्षक डॉ. श्रीधर जोशी यांच्या सजग नजरेमुळे अत्यंत दुर्मीळ आणि भारतात आजवर न दिसलेला पक्षी प्रथमच आढळून आल्याची नोंद झाली आहे. ही घटना पक्षी अभ्यासकांच्या दृष्टीने ऐतिहासिक मानली जात आहे.

डॉ. जोशी हे दररोज सकाळी पक्षिनिरीक्षणासाठी फिरायला जात असतात. रविवारी, ३ ऑगस्ट रोजी सकाळी फिरताना त्यांनी एका पाणथळ जागी दोन काळे बगळे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मासे पकडताना पाहिले. त्यांनी त्वरित त्यांच्या कॅमेऱ्यात हे क्षण टिपले आणि घरी आल्यावर अधिक माहिती मिळवण्याच्या उद्देशाने सखोल अभ्यास केला. त्यावेळी त्यांना समजले की, जगात ‘कॅनोपी फीडिंग किंवा अम्ब्रेला फीडिंग’ ही अनोखी मासे पकडण्याची शैली केवळ ब्लॅक हेरॉन या आफ्रिकन पक्ष्यातच दिसून येते. आपले पंख अर्धवर्तुळात पसरण्याची या बगळ्यांची अनोखी युक्ती माशांना सावलीखाली आकर्षित करते आणि त्यांना सहज पकडता येते.

सुरुवातीला हा रातबगळा असल्याचा अंदाज काही निरीक्षकांनी व्यक्त केला. मात्र लांब पाय, संपूर्ण काळे शरीर आणि ‘कॅनोपी फीडिंग’ची खास शैली या वैशिष्ट्यांवरून सर्वांचे एकमत झाले की, तो पक्षी म्हणजेच ब्लॅक हेरॉनच आहे. ही माहिती व छायाचित्रे डॉ. जोशी यांनी ‘इंडियन बर्ड जर्नल’कडे पाठवली असून, भारतात या पक्ष्याची ही पहिलीच अधिकृत नोंद असल्याचे प्राथमिक संकेत आहेत.

ब्लॅक हेरॉन कोण?

ब्लॅक हेरॉन हा मुख्यतः पश्चिम आणि दक्षिण आफ्रिकेत आढळणारा निवासी पक्षी आहे. सेनेगल, सुडान, केनिया, टांझानिया, मोझांबिक आणि मॅडगास्कर हे त्याचे नैसर्गिक अधिवास आहेत. युरोपातही काही अपवादात्मक नोंदी (ग्रीस, इटली, डब्लिन) आहेत. मात्र भारतात आजवर या पक्ष्याचा एकही ठोस पुरावा मिळालेला नव्हता. हा पक्षी स्थलांतर करत नाही. केवळ अन्नपाण्याची कमतरता असल्यास तो परिसर बदलतो. त्यामुळे त्याच्या चिपळूणमध्ये अचानक झालेल्या आगमनाने आश्चर्य व्यक्त होत आहे.

काय आहे ‘कॅनोपी फीडिंग’?

ही एक विशिष्ट मासे पकडण्याची शैली असून, पक्षी आपल्या पंखांचा अर्धगोलाकार छत्रीसारखा आकार तयार करतो. त्या सावलीत मासे आकर्षित होतात आणि मग पक्षी त्यांच्यावर सहज झडप घालतो. ही शैली प्रामुख्याने ब्लॅक हेरॉनमध्येच दिसते.

आफ्रिकेतील हे पक्षी इथे कसे आले, हे अद्याप अनाकलनीयच आहे. गेल्या आठवड्यापासून मी ते पुन्हा पाहण्यासाठी विविध पाणथळ ठिकाणी शोध घेत आहे. — डॉ. श्रीधर जोशी, पक्षिनिरीक्षक, चिपळूण

Web Title: Two unique African birds of the Black Heron genus were spotted in the wetlands of Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.