Ratnagiri: मध्ययुगीन बारव, तलावांचा अनमोल ठेवा; राजापूर तालुक्यात कोणत्या परिसरात आहे अस्तित्व.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 16:18 IST2025-07-21T16:16:12+5:302025-07-21T16:18:48+5:30
कोकणात काही ठिकाणी ‘घोडेबाव’, असेही म्हणतात

Ratnagiri: मध्ययुगीन बारव, तलावांचा अनमोल ठेवा; राजापूर तालुक्यात कोणत्या परिसरात आहे अस्तित्व.. वाचा
राजापूर : तालुक्यातील कोतापूर तिठा, धाउलवल्ली परिसरात दोन मध्ययुगीन बारव व एक तलाव आढळला आहे. या बारव व तलाव हे मध्ययुगीन कालखंडातील जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असल्याचे मत पुणे येथील इतिहास संशोधक अनिल दुधाणे यांनी व्यक्त केले आहे.
राजापूर-धारतळे मार्गावर कोतापूर तिठा या ठिकाणी असणाऱ्या प्रवासी मार्ग निवाराशेडच्या मागच्या बाजूला साधारण १०० मीटरवर जंगलमय भागात एक बारव (पायऱ्यांची विहीर) आढळली आहे. ती नंदा बारव प्रकारातील आहे. ही बारव पूर्णत: कातळात खोदलेली असून, साधारण ५० ते ६० फूट खोल आहे. या विहिरीला एका बाजूने आतमध्ये उतरण्यासाठी पूर्वेकडून पश्चिमेकडे उतरणाऱ्या पायऱ्या आहेत. त्यांची संख्या साधारण ५०च्या आसपास आहे.
इथूनच पुढे धारतळे येथे एक तलाव असून, सद्य:स्थितीत त्यावर अलीकडच्या काळात कठडा बांधण्यात आला आहे. साधारण ५० ते ६० फूट लांब असणाऱ्या या तलावाची रुंदी २५ ते ३० फूट आहे. हा तलावही नंदा प्रकारातील असावा.
धारतळेपासून साधारण पाच किलोमीटरच्या अंतरावर पाणेरे फाटा येथेही एक नंदा प्रकारातील बारव असून, ही बारव कोतापूर येथील बारवशी मिळती जुळती आहे. सध्या ही बारव पाण्याने पूर्ण भरलेली आहे. अशा बारवांना कोकणात काही ठिकाणी ‘घोडेबाव’, असेही म्हणतात.
बारव - कुंड
हा मुळात या वास्तूप्रकाराचा आधारभूत घटक ठरतो. या कुंडाच्या वर विशिष्ट पायऱ्या देऊन एक पटांगण सोपान टप्पा ठेवत. त्यानंतर दुसरा व तिसरा सोपान ठेवून झालेला विस्तार बारव स्थापत्यात पहावयास मिळतो. एकूण एकात एक लहान होत जाणारे कुंड असे याचे स्वरूप असते. बारवेत विविध देवतांची स्थापना केलेली असते. बारवेत चौरस हा आकार प्रामुख्याने असतो. आयत व क्वचित अष्टकोनी आकार पाहावयास मिळतात. बारवेस एक ते चार मुख्य प्रवेश असतात.
कोकणात अशा बारव अस्तित्वात असून, त्याच्या स्थापत्याचे अनेक विविध प्रकार आहेत. त्यातील अनेक रचना कोकणात आढळतात. कोंढेतड येथील वापी व तडाग त्यानंतर कोतापूर, धारतळे व पाणेरे फाटा येथे आढळून आलेल्या बारवा व तलाव मध्ययुगीन जलस्थापनेच्या प्रगत दृष्टिकोनाचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांचे जतन, संवर्धन होणे महत्त्वाचे आहे. - अनिल दुधाणे, इतिहास संशोधक, पुणे