त्रिवेणी गमरे हिने रचला जागतिक विक्रम
By Admin | Updated: July 1, 2016 23:41 IST2016-07-01T22:45:14+5:302016-07-01T23:41:43+5:30
लिम्का बुकमध्ये नोंद : कमी वयात स्केटिंगमध्ये केलेल्या पराक्रमांचे सर्वांकडून कौतुक

त्रिवेणी गमरे हिने रचला जागतिक विक्रम
खेड : खेड येथील रोटरी इंग्लिश स्कूलच्या त्रिवेणी चंद्रकांत गमरे हिने कोल्हापूर येथील जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या ‘रिले स्केटिंग वर्ल्ड रेकॉर्ड’ स्पर्धेत जागतिक विक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड, इंडिया यंग अॅचिव्हर बुक आॅफ रेकॉर्ड, आर. एच. आर. इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. गमरे हिने या पराक्रमामुळे रोटरी इंग्लिश स्कूलच्या शीरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
कोल्हापूर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १५१ तासांचे रिले स्केटिंग वर्ल्ड रेकॉर्ड हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये २०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या सर्वांनी न थांबता १५१ तास ५१ मिनिटे व ५१ सेकंद हे स्केटिंग करण्याचा अनोखा विक्रम केला.
रोटरीची त्रिवेणी गमरे ही रोटरी शाळेत पहिलीच्या वर्गात शिकत आहे. या सर्व विद्यार्थ्यांची नोंद विविध रेकॉर्ड बुकमध्ये करण्यात आली आहे. त्रिवेणीला याबद्दल पदक आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. अत्यंत कमी वयात त्रिवेणी गमरे हिने हा पराक्रम केल्याने सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षक विजय निगडेकर यांनी मार्गदर्शन केले.
संस्थेचे चेअरमन बिपीन पाटणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल जोशी, मुख्याध्यापिका प्रीती नायर, उपमुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (प्रतिनिधी)
संस्थेचे चेअरमन बिपीन पाटणे यांनी त्रिवेणी गमरे हिचे अभिनंदन केले. यावेळी मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.