Ratnagiri: मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांचा पुन्हा स्टंटबाजीचा धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 19:23 IST2025-12-17T19:22:36+5:302025-12-17T19:23:01+5:30
विशेष म्हणजे, समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेण्यास बंदी असतानाही नियमांना धाब्यावर बसवून ही स्टंटबाजी

Ratnagiri: मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांचा पुन्हा स्टंटबाजीचा धुमाकूळ
दापोली : तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांकडून पुन्हा-पुन्हा सुरू असलेल्या धोकादायक स्टंटबाजीमुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. समुद्रकिनाऱ्यावर वाहने भरधाव चालवणे, गाडीच्या टपावर उभे राहून प्रवास करणे तसेच रेस लावण्याचे प्रकार सर्रास सुरू असून, त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेण्यास बंदी असतानाही नियमांना धाब्यावर बसवून ही स्टंटबाजी सुरू असल्याने अन्य पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मुरुडसह कर्दे, हर्णै आणि आंजर्ला या समुद्रकिनाऱ्यांवरही अशाच प्रकारचे प्रकार वारंवार घडत असल्याचे चित्र आहे. काही पर्यटक मद्यप्राशन करून भरधाव वाहन चालवत असल्याचे प्रकार समोर येत असून, यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. यापूर्वी कर्दे आणि हर्णै समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करीत बॅरिकेड्स लावून वाहतुकीस बंदी घातली होती. मात्र, मुरुड समुद्रकिनाऱ्यावर अद्याप प्रभावी नियंत्रण दिसून येत नसल्याची नाराजी स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
मुरुड समुद्रकिनाऱ्यावर तत्काळ पोलिस बंदोबस्त वाढवून, वाहनांवर कठोर निर्बंध लावावेत, स्टंटबाजी व मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांसह सामान्य पर्यटकांकडून केली जात आहे. प्रशासन वेळेत जागे झाले नाही, तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.