गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील जेली फिशमुळे पर्यटक हैराण, स्पर्श होताच अंगाला होतात वेदना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 18:21 IST2025-10-27T18:19:27+5:302025-10-27T18:21:53+5:30
वेदना होत राहतात व तापही येतो

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील जेली फिशमुळे पर्यटक हैराण, स्पर्श होताच अंगाला होतात वेदना
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे सध्या दिवाळी सुटीमुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याची भुरळ पडत आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर पाण्यातून चालण्याचा काहीजण आनंद लुटतात. परंतु, सध्या येथील समुद्रकिनाऱ्यावर जेली फिशचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पर्यटक हैराण झाले आहेत.
या जेली फिशबाबत स्थानिक ग्रामस्थ आणि व्यावसायिकांनी सांगितले की, जेली फिशचा स्पर्श होताच अंगाला खूप वेदना होतात. या स्पर्शामुळे अंगावर बारीक पुरळ व स्पर्श झालेल्या ठिकाणाचा भाग लाल होतो. तसेच जेली फिशचा स्पर्श झाल्याने वेदनेमुळे हाताने ताे भाग चोळल्यास आणखी त्रास होतो. यावर उपाय म्हणजे जेली फिशचा स्पर्श झाल्यास अगदी व्यवस्थित तळहाताने निळा दोरा काढल्यास वेदना कमी होतात.
तसेच काही वेळा जवळजवळ चार ते पाच तास वेदना होत राहतात व तापही येतो. त्यामुळे जेली फिशचा स्पर्श झाल्यास तत्काळ डॉक्टरकडे जावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. जेली फिशचे प्रमाण वाढल्याने पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात उतरू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.