पर्यटन झालं, पण पुण्यात पाऊल ठेवेपर्यंत धाकधूक, श्रीनगरला गेलेल्या रत्नागिरीच्या कुलकर्णी दाम्पत्याचे उद्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:34 IST2025-04-24T16:33:58+5:302025-04-24T16:34:51+5:30
शोभना कांबळे रत्नागिरी : जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगर येथील पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. मात्र, परतीच्या प्रवासात ...

पर्यटन झालं, पण पुण्यात पाऊल ठेवेपर्यंत धाकधूक, श्रीनगरला गेलेल्या रत्नागिरीच्या कुलकर्णी दाम्पत्याचे उद्गार
शोभना कांबळे
रत्नागिरी : जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगर येथील पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. मात्र, परतीच्या प्रवासात विमानतळावरच पहलगाम येथील बैसरन खोरे परिसरात झालेल्या दहशतवादी जीवघेण्या हल्ल्याची बातमी कळली आणि त्यानंतर सर्व प्रवास सुखाचा झाला तरीही पुण्याच्या भूमीवर पाय ठेवेपर्यंत धाकधूक कायम होती, अशा शब्दात रत्नागिरीतील अभ्युदय नगर भागातील रहिवासी पद्मजा कुलकर्णी यांनी आपला अनुभव सांगितला. बुधवारी सकाळी पुण्यात आल्यानंतर त्यांच्याशी फोनवरून संवाद साधल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
पद्मजा कुलकर्णी आणि त्यांचे पती नंदकुमार कुलकर्णी पुण्यातील त्यांच्या नातेवाईकांसोबत श्रीनगर येथे पर्यटनासाठी गेले होते. पुण्यातील ट्रॅव्हल्समधून एकूण ३२ जण यात सहभागी होते. रत्नागिरीतून कुलकर्णी दाम्पत्य आणि पद्मजा कुलकर्णी यांचे पुण्यातील तीन बंधू आणि त्यांच्या पत्नी असे साळसकर परिवारातील सहा मिळून एकूण आठ जण १६ एप्रिल रोजी श्रीनगरला पोहोचले. येथील विविध स्थळे पाहून ही सर्व मंडळी रविवार, २० रोजी पहलगामला गेली होती. मात्र, यावेळी काहीच गडबड दिसत नव्हती. सर्वत्र शांत होते. याठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कमांडोही होते. त्यामुळे भीतीचा लवलेशही नव्हता.
पहलगाम येथील बैसरन पाॅईंट पाहण्यासाठी बहुसंख्य पर्यटक जात असतात. सोमवारी गुलमर्ग पाहून झाल्यावर मंगळवारी दुपारी पुन्हा परतीच्या प्रवासासाठी श्रीनगर येथे विमानतळावर दाखल झालो. जाताना दिल्ली मार्गे विमानाने प्रवास होता तर येताना चंडीगड मार्गे यावे लागणार होते. दुपारी अगदी जेवतानाही पहलगाम हल्ल्याविषयी काहीच माहीत नव्हते. मात्र, श्रीनगर विमानतळावर आल्यावर पहलगाम हल्ल्याची बातमी कळली, त्यात २८ जण गेल्याचे कळले आणि मग आपण घरी सुखरूप पाेहोचू ना? या भीतीने अस्वस्थ केले, असे पद्मजा कुलकर्णी सांगतात.
त्यानंतर चंडीगड येथे उतरेपर्यंत त्यांना आपल्या घरच्यांशी कुठल्याही तऱ्हेचा संपर्क होत नव्हता. मात्र, चंडीगड विमानतळावर पोहोचल्यानंतर घरच्यांचे फोन खणाणू लागले. नातेवाईकांनी त्यांचे आवाज ऐकल्यावर आणि सर्व सुखरूप आहेत, हे कळल्यावर हायसे वाटले. अखेर चंडीगडहून पुण्यात रात्री १ वाजता ही सर्व मंडळी पोहोचली आणि घरी सुखरूप आणल्याबद्दल सर्वांनीच ईश्वराचे आभार मानले.