गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचविले; अहिल्यानगर येथून आले होते देवदर्शन, पर्यटनासाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 16:19 IST2025-09-13T16:17:11+5:302025-09-13T16:19:17+5:30
समुद्रात लाटांचा जोर अद्यापही कायम

गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचविले; अहिल्यानगर येथून आले होते देवदर्शन, पर्यटनासाठी
गणपतीपुळे (जि.रत्नागिरी) : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रात अंघाेळ करताना बुडणाऱ्या तीन तरुणांना वाचविण्यात स्थानिक जीवरक्षक आणि किनाऱ्यावरील व्यावसायिकांना यश आले. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमाराला घडली. हे तीनही तरुण अहिल्यानगर येथील रहिवासी आहेत.
रामहरी राजपूत (वय २५), किशन वाघमारे (वय ३०) व सुनील जाधव (वय २५) अशी तिघांची नावे आहेत. अहिल्यानगर येथील पाच तरुण गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी व देवदर्शनासाठी आले हाेते. देवदर्शन करून या पाच तरुणांपैकी तिघे जण अंघोळीसाठी समुद्रात उतरले होते. गणपतीपुळे येथील समुद्रात लाटांचा जोर अद्यापही कायम आहे. मोठमोठ्या लाटा उसळी घेत असतानाच अचानक हे तरुण खोल पाण्यात ओढले गेले. त्यांना पाण्याबाहेर येणे मुश्कील हाेताच त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
यावेळी किनाऱ्यावर असलेले गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक उमेश म्हादे, अनिकेत चव्हाण यांनी तत्काळ समुद्रकिनाऱ्यावरील स्थानिक व्यावसायिकांना माहिती देऊन समुद्राकडे धाव घेतली. जीवरक्षक उमेश म्हादे व अनिकेत चव्हाण, व्यावसायिक ओंकार शेलार, रूपेश पाटील, गणपतीपुळेचे उपसरपंच संजय माने यांनी समुद्राच्या पाण्यात जाऊन या तिघांना सुखरूपपणे बाहेर काढले.