Ratnagiri: कशेळीनंतर आणखी तीन गावात सौरऊर्जेचा प्रकाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 16:27 IST2025-02-05T16:26:34+5:302025-02-05T16:27:12+5:30
लवकरच ही गावे विजेपासून स्वयंपूर्ण होणार

संग्रहित छाया
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील कशेळी गावामध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यात येत असतानाच चिपळूण तालुक्यातील आणखी तीन गावे या प्रकल्पामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ४ गावांमध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना राबवण्यात येत आहे. त्यामुळे १,६६९ गावे साैरऊर्जेने उजळणार आहेत. ही गावे विजेपासून स्वयंपूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत.
वीज ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणारी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. ‘रुफ टॉप सोलर सिस्टिम’साठी केंद्र शासनाकडून अनुदान देण्यात येते. वीज ग्राहकाला कमीत कमी ३० हजार रुपयांपासून ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान निश्चित करण्यात आले आहे.
राजापूर तालुक्यातील कशेळी गाव ९६५ लोकसंख्या असलेले, तसेच ६१६ घरे असलेले गाव आहे. हे गाव जिल्हा परिषद कृषी विभागाकडून ‘मॉडेल’ म्हणून घेण्यात आले आहे. त्यानंतर चिपळूण तालुक्यातील तनाळी, आंबेरे आणि मोरवणे या तीन गावांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यासाठी गावांमध्ये बैठका घेण्यात आल्या आहेत. ही गावेही हा प्रकल्प राबवण्यास तयार झाली आहेत. त्यामुळे लवकरच ही गावे विजेपासून स्वयंपूर्ण होणार आहेत. ही योजना राबवण्यासाठी महावितरण, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि सर्व पंचायत समित्या प्रयत्नशील आहेत.
वीज निर्मिती अनुदान
- १ किलो वॅटसाठी - ३० हजार रुपये
- २ किलो वॅटसाठी - ६० हजार रुपये
- ३ किलो वॅटसाठी - ७८ हजार रुपये
गाव - घरे - लोकसंख्या
- कशेळी - ६१६ - ९६५
- तनाळी - ४२० - ९३६
- आंबेरे - १८३ - ६५४
- मोरवणे - ४५० - १३५०