विनोद पवारराजापूर : तीन वर्षांपूर्वी कागदी नकाशावर आखलेल्या राजापूरच्या नव्या पूररेषेचे लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी जागोजागी चिन्हांकन करण्यास सुरुवात केली असल्याने राजापूरवासियांमधून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. तिपटीने वाढलेल्या या नव्या पूररेषेचे फेरसर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. हीच पूररेषा लादण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.नव्याने आखलेली पूररेषा राजापूर शहराच्या विकासातील अडथळा मानली जात आहे. सद्यस्थितीत शहरात येणारा पूर पाहता नव्याने रेखांकन करण्यात आलेली पूररेषा कितीतरी पटीने मोठी आहे. गेल्या पाच-सहा दशकांत राजापूर शहरात ज्या भागात कधीच पुराचे पाणी घुसले नाही, असा भागही आता या नव्या पूररेषेत आला आहे.नव्याने लागू केलेल्या या पूररेषेमुळे राजापूर शहर बाजारपेठेबरोबरच निम्म्याहून अधिक शहर बाधित होत असल्याने विकासाची चाके थांबणार आहेत. घरदुरुस्ती, नवीन बांधकाम व विकासकामे यात ही पूररेषा अडथळा ठरणार आहे.
पूररेषा तिपटीने वाढली
- नव्या पूररेषेमुळे राजापूर बाजारपेठेचे अस्तित्वच धोक्यात आले असून, व्यापारी संघानेही या पूररेषेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. १९८३ च्या महापुरामुळे अस्तित्वात आलेली राजापूर शहरातील पूररेषा गेल्या चार दशकांत शहर विकासाला बाधक ठरत होती. त्यातच आता ही पूररेषा तिपटीने वाढल्याने शहराचे अतोनात नुकसान होणार आहे.
- शासनाने या नव्याने आखलेल्या पूररेषेचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याची दखल न घेतल्यास या नव्या पूररेषेविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही राजापूरवासियांनी दिला आहे.
गुगलच्या माध्यमातून ही नवी पूररेषा तयार करण्यात आली आहे. राजापूर शहर आणि बाजारपेठेच्या विकासामध्ये ती अडचणीची असून, या नव्या पूररेषेच्या माध्यमातून राजापूर शहर आणि बाजारपेठ संपवण्याचे कटकारस्थान रचले जात नाही ना? चुकीच्या पद्धतीने केलेल्या पूररेषेला व्यापाऱ्यांचा विरोध असून, त्याबाबत लोकप्रतिनिधींशी सातत्याने चर्चा करून पूररेषेला विरोध दर्शविण्यात आला आहे. पूररेषेचे फेरसर्वेक्षण व्हावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल. - संदीप मालपेकर, अध्यक्ष, राजापूर तालुका व्यापारी संघ