स्वच्छता व्यवस्थापनात रत्नागिरीसह जिल्ह्यातील तीन बसस्थानके चमकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 18:04 IST2025-07-29T18:04:18+5:302025-07-29T18:04:42+5:30
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान; कुडाळला तृतीय क्रमांक

स्वच्छता व्यवस्थापनात रत्नागिरीसह जिल्ह्यातील तीन बसस्थानके चमकली
रत्नागिरी : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याने मुंबई प्रादेशिक स्तरावर अग्रस्थान मिळवले आहे. विभागातील बसस्थानकांनी स्वच्छता आणि व्यवस्थापनातील आपली क्षमता सिद्ध केली आहे. रत्नागिरीचे मध्यवर्ती बसस्थानक (अ वर्ग), पाली (ब वर्ग), आणि माखजन (क वर्ग) या बसस्थानकांनी आपापल्या गटात चमकदार कामगिरी केली आहे.
जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अभियानाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्रैमासिक सर्वेक्षण अहवालात बसस्थानकाची स्वच्छता, प्रशासन, व्यवस्थापन आणि हरित उपक्रम अशा विविध निकषांवर आधारित गुणांकन केले गेले. सर्वेक्षणानुसार ‘अ’ वर्गवारीत रत्नागिरी (नवीन) मध्यवर्ती बसस्थानकाने ८९ गुण मिळवून सर्वाधिक आघाडी घेतली.
यामध्ये बसस्थानक व प्रसाधनगृहासाठी ३० पैकी २९ गुण, बसस्थानक व्यवस्थापनासाठी ५० पैकी ४४ गुण आणि हरित बसस्थानकासाठी ३० पैकी १६ गुण मिळाले. या कामगिरीमुळे रत्नागिरीने प्रथम क्रमांक मिळवला, तर बोईसरने ८३ गुण मिळवून द्वितीय आणि कुडाळने ७४ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
‘ब’ वर्गवारीत पाली बसस्थानकाने ८४ गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. मुंबईतील दादर बसस्थानकाने ८५ गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला, तर ‘क’ वर्गवारीत माखजन बसस्थानकाने ७४ गुण मिळवले. या वर्गवारीतील परळ बसस्थानकाने (मुंबई) ८९ गुण मिळवून प्रथम स्थान मिळवले, नालासोपारा (पालघर) बसस्थानकाने ७६ गुण मिळवून द्वितीय आणि माखजन (संगमेश्वर) बसस्थानकाने ७४ गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
हा निकाल पहिल्या त्रैमासिक सर्वेक्षणानंतर जाहीर करण्यात आला. एकूण चारवेळा सर्वेक्षण होणार असून, नंतर जे बसस्थानक स्वच्छ आणि सुंदर या निकषांमध्ये बसेल, त्याला बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षण सुरू झाले आहे.