भाजपमध्ये मतभेद असले तरी मनभेद नाहीत- रवींद्र चव्हाण यांची स्पष्टोक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 16:28 IST2019-12-14T16:26:29+5:302019-12-14T16:28:01+5:30
माने अजिबात नाराज नाहीत, भाजपा एक कुटुंब आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असले तरी मनभेद निश्चितच नाहीत. अपक्ष म्हणून अर्ज भरणारे मुकुंद जोशी हेसुद्धा अर्ज मागे घेतील,असा विश्वास माजी राज्यमंत्री व भाजपचे कोकणचे पालक आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

भाजपमध्ये मतभेद असले तरी मनभेद नाहीत- रवींद्र चव्हाण यांची स्पष्टोक्ती
रत्नागिरी : भाजपमध्ये कोणतेही गट- तट नाहीत. सारे एकदिलाने अॅड. दीपक पटवर्धन यांना निवडून देण्याकरिता एकजुटीने प्रचारयंत्रणेत सहभागी झाले आहेत. माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्यासमवेत सर्वजण अॅड. पटवर्धन यांना विजयी करण्यासाठी नियोजन करत आहेत. माने अजिबात नाराज नाहीत, भाजपा एक कुटुंब आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असले तरी मनभेद निश्चितच नाहीत. अपक्ष म्हणून अर्ज भरणारे मुकुंद जोशी हेसुद्धा अर्ज मागे घेतील,असा विश्वास माजी राज्यमंत्री व भाजपचे कोकणचे पालक आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
रत्नागिरीत शनिवारी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसंदर्भात भाजपच्या प्रचार यंत्रणेची बैठक दीर्घ काळ चालली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. त्यावेळी सोबत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, प्रा. नाना शिंदे, माजी तालुकाध्यक्ष सतीश शेवडे, अॅड. अविनाश तथा भाऊ शेट्ये, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर उपस्थित होते. तसेच शहराध्यक्ष सचिन करमरकर, राजू भाटलेकर, गटनेता समीर तिवरेकर, नगरसेवक राजू तोडणकर, बिपीन शिवलकर, राजश्री शिवलकर आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, बाळ माने गेली ४० वर्षे भाजपशी जोडलेले आहेत. त्यांचे नेतृत्व केवळ रत्नागिरीपर्यंत मर्यादित नसून राज्यापर्यंत पोहचलेले आहे. त्यांची कोणतीही नाराजी नाही. भाजप एक कुटुंब आहे. कुटुंबात मतभेद असणे हे निकोप लोकशाहीचे लक्षण आहे. पक्षात आलबेल नाही, असे पत्रकारांना का वाटते? बाळ माने व मी गेली ३५ वर्षे पक्षात काम करत आहोत. प्रत्येक वेळी पक्षाकडून वेगवेगळी जबाबदारी येत असते, प्रत्येक जण ती पार पाडत असतो, बाळ माने नाराज नाहीत, असे आमदार चव्हाण म्हणाले.
चर्चेने गैरसमज दूर झाले : बाळ माने
माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने म्हणाले की, भाजप ही संघटना कुटुंबासारखी आहे. एकाच घरात भावाभावांमध्येही मतभेद असू शकतात. मात्र, आमच्यात जे काही विषय होते ते चर्चेने दूर झाले आहेत. मला संघटनेतून बाजूला केले असा काही विषय नाही. मी ११ दिवस परदेशात होतो. दीपक पटवर्धन व माझे चांगले संबंध आहेत. नगराध्यक्ष पदासाठी त्याचे नाव घोषित करताना मलाही फोन आला व मी लगेच अनुमोदन दिले, असे त्यांनी सांगितले.