Maharashtra Crime news: दापोली तालुक्यातील उन्हवरे गावात लहान भावाची मोठ्या भावाने हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली. रविवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली असून, यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
खून झालेल्या व्यक्तीचे नाव विनोद गणपत तांबे (वय 36, रा. बौद्धवाडी, उन्हवरे) आहे. विनोदचा मोठा भाऊ रवींद्र गणपत तांबे याने खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. कौटुंबिक वादातून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर रवींद्रने विनोदवर धारदार हत्याराने वार करत त्याचा जागीच खून केला, अशी प्राथमिक माहिती आहे.
रवींद्र तांबेला पोलिसांनी ताब्यात घेतले
घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी दापोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. संशयित आरोपी रवींद्र तांबे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गंभीर घटनेच्या तपासासाठी चिपळूण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र राजमाने आणि दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांनी घटनास्थळी भेट दिली असून, फॉरेन्सिक पथकाला देखील तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे.
दरम्यान, या खुनामागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून विविध अंगाने तपास सुरू आहे. एकाच कुटुंबातील दोन भावांमध्ये इतका तीव्र वाद झाला, की त्याचा शेवट खुनात झाला, ही गोष्ट परिसरातील नागरिकांमध्ये भय आणि हळहळ निर्माण करणारी आहे.