आयटीआयमध्ये अनेक पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2016 23:49 IST2016-07-03T23:49:01+5:302016-07-03T23:49:01+5:30
कामाचा ताण : रत्नागिरीसह उर्वरित महाराष्ट्रात ३०० आयटीआय प्राचार्यांविना

आयटीआयमध्ये अनेक पदे रिक्त
शोभना कांबळे ल्ल रत्नागिरी
व्यवसायाभिमुख शिक्षण देणाऱ्या जिल्ह्यातील १२ संस्थांमध्ये मंजूर असलेल्या १७ पैकी श्रेणी १ व श्रेणी २ च्या अधिकाऱ्यांची १४ पदे रिक्त आहेत, तर सिंधुदुर्गात मंजूर १३ पैकी केवळ ३ पदे भरलेली आहेत. राज्यभर अशीच स्थिती असून, सुमारे ३०० संस्था प्राचार्यांविना असून, उपप्राचार्य, निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यासारखी वर्ग-१ व वर्ग-२ ची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत.
स्वातंत्र्यकाळात कुशल मनुष्यबळ तयार व्हावे, सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य विकासाचे धडे मिळावेत या उद्देशाने केंद्र सरकारने कौशल्य विकास आणि उद्योजकता हे नवीन खाते निर्माण केले. महाराष्ट्रातही हे खाते सुरू झाले. रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. मात्र, सध्या या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत.
महाराष्ट्रात सध्या ४२७ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. तेवढेच खासगी आयटीआयही कार्यरत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्यात एक अशा एकूण नऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. राजापूर, खेड, रत्नागिरी या तीन ठिकाणी तर तांत्रिक विद्यालयेही आहेत. मात्र, या सर्व संस्थांमध्ये मिळून १ व २ श्रेणी अधिकाऱ्यांची सध्या १८ पदे रिक्त आहेत. त्यात लांजा, रत्नागिरी, गुहागर आणि दापोली वगळता सर्वत्र प्राचार्य व प्रशिक्षणार्थी सल्लागार यासारखी पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी हे पद गेल्या चार वर्षांपासून रिक्त आहे. मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्थाही सध्या प्राचार्यांविना सुरू आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्यही गेल्या जानेवारीमध्ये सेवानिवृत्त झाले. तत्पूर्वी ते दीर्घकालीन रजेवर गेले आहेत. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांचा कार्यभार द्वितीय श्रेणी अधिकाऱ्यांना सांभाळावा लागत आहे. मात्र, या अधिकाऱ्यांचीही आता बदली झाल्याने एकाचवेळी पुन्हा दोन रिक्त पदांमध्ये भर पडली आहे.
सध्या राज्यभर ३००हून अधिक संस्थांमध्ये ही पदे रिक्त असल्याने प्रत्येक प्राचार्याला कमीतकमी ३ ते ४ संस्थांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे. राज्यातील अनुशेष व चालू पदे भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तब्बल १६ वर्षानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निरनिराळ्या वेतन श्रेणीवरील चार जाहिरातींच्या अनुषंगाने २१४ रिक्त पदे भरण्यासाठी २०१४ मध्ये सरळसेवा भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात एकूण ५६ पदांचा समावेश होता. आता ही संख्या २००पेक्षा अधिक झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून लेखी परीक्षा व मुलाखत प्रक्रिया पार पडून यादी सप्टेंबर २०१५मध्ये शासनाकडे पाठवण्यात आली आहे. मात्र, मागील नऊ महिन्यात निवड झालेल्या एकाही उमेदवाराला अद्याप नियुक्तीपत्र देण्यात आलेले
नाही.
आय. टी. आय. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर कौशल्य विकासाचे मार्गदर्शन कंपनीकडून दिले जाते. त्यामध्ये समन्वयकाची भूमिका महत्त्वाची असते. ही भूमिका बजावणाऱ्या सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागाराची पदे संपूर्ण राज्यात रिक्त आहेत. संस्थाप्रमुख नसेल तर या संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्याचे धडे कसे मिळणार? सर्व आयटीआयमध्ये ही स्थिती असूनही शासनाप्रमाणे स्थानिक लोकप्रतिनिधीही याबाबत बेदखल आहेत.
अधिकारीच नाही : ... तर भरती प्रक्रियाच रद्द होण्याची भीती
1खासगी तसेच शासकीय संस्थांचा कारभार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पाहात असतो. मात्र, गेल्या चार वर्षांपासून या विभागाला अधिकारीच नाही. तसेच प्रशिक्षणाचा दर्जा उंचावावा, याकरिता विभागीय कार्यालयात निरीक्षकाची पदे असतात. मात्र, रत्नागिरीत दोन्ही पदे रिक्त आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात ही पदे रिक्त आहेत. तसेच ठराविक तांत्रिक शाळांमध्ये मुख्याध्यापक पद भरलेले असून, याठिकाणी प्रशिक्षण सल्लागाराची पदेही अद्याप रिक्त आहेत.
2निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय कागदपत्र पडताळणी पूर्ण झालेली आहे. निवड झालेल्या उमेदवारांमध्ये कोकणातील बऱ्याच उमेदवारांचा समावेश आहे. असाच एक वर्षाचा कालावधी उलटून गेला तर शासन परिपत्रकानुसार संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द होऊ शकते. त्यामुळे ही भीती निवड झालेल्या उमेदवारांमध्ये निर्माण झाली आहे. निवड होऊनही या उमेदवारांना नियुक्तीपत्र न देण्यामागचे शासनाचे काय धोरण आहे, हे कळू शकत नाही.
3कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठीचे ‘कौशल्य विकास आणि उद्योजकता’ हे खाते मुख्यमंत्री यांच्याकडे आहे. भरती प्रक्रियेबाबत त्यांना वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, त्यांनी या निवड झालेल्या उमेदवारांच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवली आहे. त्यांचे सचिव, उपसचिवही ही पदे काही दिवसांत भरणार, अशी केवळ आश्वासनेच कित्येक महिने देत आहेत.
ठिकाण मंजुर पदे रिक्त पदे
रत्नागिरी शासकीय आय. टी.आय. ३ ३
टेक्निकल १ १
मुलभूत प्रशिक्षण सूचना अधिकारी १ १
रत्नागिरी मुलींचा आय. टी. आय. १ १
संगमेश्वर १ ----
लांजा १ ----
दापोली १ ----
चिपळूण २ २
मंडणगड १ १
खेड २ २
राजापूर २ २
गुहागर १ १
एकूण १७ १४