रत्नागिरी : कामावर जा असे सांगितल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी पाट मारून जखमी केले. शनिवार २८ मे रोजी नाचणे गोडावून स्टॉप येथे ही घटना घडली. याप्रकरणी पती विरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नीलेश बाळकृष्ण बेटकर (४०, मूळ रा. असोडे खानू, लांजा सध्या रा. गोडावून स्टॉप, रत्नागिरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात पत्नी सानिका (३९) हिने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.नीलेश कामावर गेला नाही म्हणून सानिका त्याला कामावर जाण्यासाठी उठवत होती. परंतु, नीलेश उठला नाही तेव्हा तिने त्याला कामावर जा, असे सांगितले. याचा राग नीलेशला आला. तो रागाच्या भरात तेथून उठला आणि शेजारी राहणाऱ्या भारती सूर्यवंशी यांच्या घरी गेला. त्यांच्या घरातील पाट त्याने आणला आणि सानिकाच्या डोक्यात मारला. त्यानंतर त्याने तिला शिवीगाळ केली. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.
Crime News Ratnagiri: पत्नी म्हणाली कामावर जा, संतापलेल्या पतीने डोक्यात घातला लाकडी पाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 13:19 IST