फसवणुकीचे धागेदाेरे थेट हैद्राबादपर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 09:59 IST2025-01-20T09:57:44+5:302025-01-20T09:59:19+5:30
Ratnagiri News: दोन महिन्यांपूर्वी शहरातील एकाची तब्बल ६१ लाखाची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली हाेती. फसवणुकीच्या या गुन्ह्याचे धागेदाेरे हैद्राबादपर्यंत पाेहाेचले आहेत. रत्नागिरीतील सायबर क्राईमच्या पथकाने या फसवणुकीप्रकरणी दोघांना हैद्राबादमधून अटक केली आहे.

फसवणुकीचे धागेदाेरे थेट हैद्राबादपर्यंत
रत्नागिरी - दोन महिन्यांपूर्वी शहरातील एकाची तब्बल ६१ लाखाची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली हाेती. फसवणुकीच्या या गुन्ह्याचे धागेदाेरे हैद्राबादपर्यंत पाेहाेचले आहेत. रत्नागिरीतील सायबर क्राईमच्या पथकाने या फसवणुकीप्रकरणी दोघांना हैद्राबादमधून अटक केली आहे. त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
निवास पेदेचा मुडिकोंडा आणि उदय लक्ष्मण दोरापल्ली (दाेघेही रा. देवारकोंडा, हैद्राबाद) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात रत्नागिरीतील सायबर पोलिस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यानुसार, दोन महिन्यांपूर्वी दाेघांनी फिर्यादीशी संपर्क साधून फॉरेस्टमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून चांगल्या परताव्याचे आमिष दाखविले होते. त्यांच्या या आमिषाला बळी पडून फिर्यादीने तब्बल ६१ लाखांची गुंतवणूक केली होती. परंतु, त्यानंतर फिर्यादीला कोणताही परतावा तसेच मूळ रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी रत्नागिरी सायबर पोलिस स्थानकात याबाबत फिर्याद दिली. याप्रकरणाचा तपास करताना सायबर पोलिसांना तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे फसवणूक करणारे हे हैद्राबादला असल्याचे धागेदोरे मिळाले.
दाेघांच्या मुसक्या आवळल्या
सायबर क्राईमच्या पथकाने हैद्राबाद येथे जाऊन दाेघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्यावर हैद्राबाद येथेही एक गुन्हा
दाखल असल्याचे तपासात पुढे आले आहे.
ही कामगिरी सायबर क्राईमच्या पोलिस निरीक्षक स्मिता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नितीन पुरळकर, पोलिस हेडकाॅन्स्टेबल सौरभ कदम, अजिंक्य ढमढेरे यांनी केली.