चिपळुणात ‘माणुसकीचा झरा’ पोहोचला गरजूंच्या घरात
By संदीप बांद्रे | Updated: November 7, 2023 18:43 IST2023-11-07T18:42:52+5:302023-11-07T18:43:07+5:30
चिपळूण : चिपळूण पत्रकार संघातर्फे ‘माणुसकीचा झरा’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाला चिपळूण शहरासह तालुक्यातून मोठा प्रतिसाद ...

चिपळुणात ‘माणुसकीचा झरा’ पोहोचला गरजूंच्या घरात
चिपळूण : चिपळूण पत्रकार संघातर्फे ‘माणुसकीचा झरा’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाला चिपळूण शहरासह तालुक्यातून मोठा प्रतिसाद लाभला. या उपक्रमांतर्गत जमा करण्यात आलेले साहित्य घेऊन पत्रकार संघाचे पदाधिकारी आदिवासी कातकरी वाड्यावर पाेहाेचले हाेते. याठिकाणी या साहित्याचे वितरण करण्यात आले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘माणुसकीचा झरा’ या उपक्रमांतर्गत तालुकावासीयांना दर्जेदार वस्तू व कपडे गरजूंना देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला शहरासह ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळाला. पत्रकार संघाचे अध्यक्ष नागेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कालुस्ते, कोळकेवाडी पश्चिम हसरेवाडी, अलोरे, नागावे, कुंभार्ली, आकले या ठिकाणी पत्रकारांनी प्रत्यक्ष भेटी देत या वस्तूंचे वाटप केले. यावेळी कातकरी समाजाच्या व्यथा, त्यांचे प्रश्न आणि अडचणी समजून घेतल्या. याबाबत शासनस्तरावर चिपळूण पत्रकार संघटना पाठपुरावा करेल, असे आश्वासन संघटनेतर्फे देण्यात आले.
कोळकेवाडी या ठिकाणी माजी सरपंच नीलेश कदम, आकले कातकरी वस्तीत माजी जिल्हा परिषद सदस्य जगताप, आदिवासी कातकरी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकात जाधव, तालुकाध्यक्ष जगताप यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागेश पाटील, समीर जाधव, संदीप बांद्रे, राजेंद्र शिंदे, राजेश जाधव, गौरव तांबे, संतोष सावर्डेकर, राजेश कांबळे, सुभाष कदम, सुशांत कांबळे, सुनील दाभोळे, मुझप्फर खान, संतोष कुळे, महेंद्र कासेकर यांनी मेहनत घेतली.