कशेडी घाटातील दुसऱ्या भुयारी मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त टळला, गर्डरच्या कामाचे क्युरिंग अपूर्णच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 11:47 IST2025-01-27T11:46:48+5:302025-01-27T11:47:10+5:30
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील कशेडी घाटातील दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभ प्रजासत्ताकदिनी दि. २६ जानेवारी २०२५ रोजी हाेणार ...

कशेडी घाटातील दुसऱ्या भुयारी मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त टळला, गर्डरच्या कामाचे क्युरिंग अपूर्णच
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील कशेडी घाटातील दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभ प्रजासत्ताकदिनी दि. २६ जानेवारी २०२५ रोजी हाेणार असल्याचे सांगण्यात येत हाेते. मात्र, रायगड जिल्ह्यातील कातळी भोगावच्या पुलावरील गर्डरच्या कामाचे क्युरिंग अपूर्ण असल्याने प्रजासत्ताकदिनाचा मुहूर्त टळला आहे.
तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भुयारी मार्गाचा शुभारंभ दुहेरी रस्ता स्वरूपात करण्यात आला हाेता. अलीकडेच पहिल्या भुयारी मार्गातील काम पूर्णत्वास गेल्याने या मार्गातून दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे. मध्यंतरी, कातळी-भोगावपर्यंतच्या रस्त्यावरील पुलांवर गर्डर बसविण्याच्या कामानिमित्त भुयारी मार्गातून वाहतूक बंद करण्यात आली होती.
पुलावर गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रजासत्ताकदिनी दुसऱ्या भुयारी मार्गातील वाहतुकीचा शुभारंभ करण्याच्या चर्चा सुरू झाल्या हाेत्या. मात्र, दुसऱ्या भुयारी मार्गाच्या आतील भागातील भुयाराच्या दुतर्फा संरक्षक कठडे बांधण्याचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. विद्युत प्रकाशझोताचे काम ८० टक्केच पूर्ण झाले आहे. दोन्ही भुयारांना जोडणारे चार भुयारी मार्ग अपूर्णावस्थेत आहेत, व्हेंटिलेशनसाठी, तसेच भुयारामध्ये हवा खेळती राहण्यासाठी १० मोठ्या आकाराचे एक्झॉस्ट फॅन बसविण्यासाठी आणून भुयारामध्येच ठेवण्यात आले आहेत, दुसऱ्या भुयारी मार्गातही वरील बाजूच्या कातळामधून चार-पाच ठिकाणी पाण्याची संततधार सुरू आहे.
प्रजासत्ताकदिनी कातळी-भोगावच्या हद्दीतील कशेडी घाटाला पर्यायी दुसरा भुयारी मार्ग सुरू होणार नाही. भुयारी मार्गापर्यंतच्या रस्त्यावरील पुलांवर गेल्याच महिन्यामध्ये बसविण्यात आलेले गर्डर आणि पिलर्स एकसंध होण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. - पंकज गोसावी, अभियंता, मुंबई-गाेवा राष्ट्रीय महामार्ग.