‘रत्नागिरी हापूस’चे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 17:49 IST2025-03-22T17:48:02+5:302025-03-22T17:49:10+5:30
यावर्षीच्या एकूण हंगामात आंबा उत्पादन २५ ते ३० टक्केच

‘रत्नागिरी हापूस’चे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
रत्नागिरी : स्थानिक बाजारपेठेत ‘रत्नागिरी हापूस’ विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. मात्र, आंब्याचे दर अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे असल्याने सर्वसामान्यांसाठी आंबा ‘अगाेड’च आहे. सध्या बाजारात ८०० ते १६०० रुपये डझन दराने आंब्याची विक्री केली जात आहे. हा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.
यावर्षी नैसर्गिक दृष्टचक्रामुळे जेमतेम २५ ते ३० टक्केच आंबा उत्पादन आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उष्म्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे फळांची माेठ्या प्रमाणात गळ झाली. शिवाय फळे भाजली असून, फळांवर डाग पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. वाढत्या उष्म्यामुळे तयार आंबा शेतकरी विक्रीसाठी मुंबई, पुणे बाजारात पाठवत आहेत. मात्र, आंब्याची आवक वाढल्याने दरही घसरले आहेत. त्यामुळे आता स्थानिक बाजारात आंबा विक्रीसाठी येऊ लागला आहे.
स्थानिक बाजारपेठेत सध्या हापूस ८०० ते १६०० रुपये डझन आहे. हा दर सर्वसामान्यांना न परवडणारा आहे. शिमगाेत्सवासाठी गावी आलेल्या काही चाकरमान्यांनी किरकाेळ स्वरूपात हापूसची खरेदी केली. मात्र, चढ्या दरामुळे खरेदीचे प्रमाण कमी आहे. सध्या पायरीलाही हापूसचा दर असल्याने आंबा अजूनही ‘अगाेड’च राहिला आहे.
कच्चा-पिका आंबा
कच्चा व पिका दोन्ही प्रकारचा आंबा विक्रीसाठी उपलब्ध आहे. पिकलेल्या आंब्याला कच्च्यापेक्षा डझनाला १०० ते २०० रुपये जास्त मोजावे लागत आहेत. सहा डझनपासून चार डझन आकाराची फळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कच्च्यापेक्षा पिकलेल्या आंब्याला वाढती मागणी असून, एक व दोन डझनचे बाॅक्स विक्रीसाठी आले आहेत.
यावर्षीच्या एकूण हंगामात आंबा उत्पादन २५ ते ३० टक्केच आहे. सुरुवातीचा आंबा कमी आहे. एप्रिलमध्ये आवक वाढेल, पुन्हा मे मध्ये आवक कमी होईल. गतवर्षी या हंगामात आंबा उत्पादन जास्त असल्यामुळे दर कमी होते. परंतु, यावर्षी आंबा उत्पादन कमी असल्यामुळे दर टिकून आहेत. - सतीश पवार, विक्रेता, रत्नागिरी