रत्नागिरी : जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना आधुनिक केले पाहिजे. त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर त्यांच्यावरचा ताण कमी केला पाहिजे. पोलिसांबद्दल आदरयुक्त भीती असलीच पाहिजे, त्याचबरोबर पोलिसांनाही जनतेबद्दल प्रेम हवे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी पोलिस दलाच्या व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम, १० चारचाकी वाहने व १४ ई-बाइक यांच्या लोकार्पणप्रसंगी केले.शहरातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात गुरुवारी रत्नागिरी पोलिस दलामार्फत व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टम (VMS), १० चारचाकी वाहने आणि १४ ‘सी प्रहरी’ (ई-बाइक) यांचा लोकार्पण सोहळा व उद्घाटनमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. या आधुनिक प्रणालीचा उपयोग जनतेसाठी व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार भास्कर जाधव, आमदार किरण सामंत, विलास चाळके, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, डीवायएसपी राधिका फडके, परिवीक्षाधीन डीवायएसपी निखिल पाटील, शिवप्रसाद तारवे उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात नागरिकांच्या सुविधेसाठी रत्नागिरी पोलिस दलामार्फत VMS प्रणाली सुरू करण्यात आली आहे. गुन्हे रोखण्यासाठी गस्त वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पोलिसांकरिता १० चारचाकी वाहने तसेच पर्यटकांची सुरक्षितता आणि समुद्रकिनाऱ्यावरील दुर्घटना रोखण्यासाठी गस्त वाढविण्याच्या दृष्टीने १४ ‘सी प्रहरी‘ची (ई-बाइक) नव्याने रत्नागिरी पोलिस दलाच्या ताफ्यात भर पडली असल्याचे सांगितले.आमदार जाधव यांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून गुन्ह्यांची एकल करून त्यांना शिक्षा देण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यांना तोंड देत पोलिस त्यांचे रक्षण करीत असल्याचे म्हटले. यावेळी पोलिस अधीक्षक आणि त्यांच्या जिल्हा दलाच्या कार्याबद्दल मंत्री सामंत आणि आमदार जाधव यांनी मनापासून काैतुक केले. कार्यक्रमादरम्यान सायबर, अपघात आदी गुन्ह्याबाबत माहितीपट दाखविण्यात आले. अपर पाेलिस अधीक्षक गायकवाड यांनी आभारप्रदर्शन केले. मंजिरी गोखले आणि कश्मिरा सावंत यांनी सूत्रसंचालन केले.