रत्नागिरीच्या ‘इंद्रधनू’चा पॅटर्न महाराष्ट्रात राबविणार : मंत्री उदय सामंत
By शोभना कांबळे | Updated: November 18, 2023 14:01 IST2023-11-18T14:00:54+5:302023-11-18T14:01:07+5:30
महाराष्ट्रामधील रांगोळी कलाकारांना राज्यात व्यासपीठ मिळवून देणार

रत्नागिरीच्या ‘इंद्रधनू’चा पॅटर्न महाराष्ट्रात राबविणार : मंत्री उदय सामंत
रत्नागिरी : रत्नागिरीच्या इंद्रधनु रांगोळी प्रदर्शन स्पर्धेचा पॅटर्न महाराष्ट्रात राबवणार असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरातील दामले विद्यालयात सुरू असलेल्या इंद्रधनू रांगोळी प्रदर्शनातील कलाकारांच्या सत्काराप्रसंगी केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रामधील रांगोळी कलाकारांना राज्यात व्यासपीठ मिळवून देणार असल्याचेही सांगितले. हे प्रदर्शन २३ नोव्हेंबरपर्यंत नागरिकांसाठी खुले आहे.
दिवाळी सणाचे औचित्य साधून उदय सामंत फाउंडेशनतर्फे इंद्रधनु रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन दामले विद्यालय रत्नागिरी येथे केले आहे. यामध्ये सहभागी झालेल्या रांगोळी कलाकारांचा सन्मान मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. या रांगोळी प्रदर्शनाला रत्नागिरीकरांनी उत्तम प्रतिसाद दिला असून या कलाकारांच्या कलेला दाद दिली आहे. या प्रदर्शनात जिल्ह्यातील आणि राज्यातील १९ दिग्गज रांगोळीकार यांनी सहभाग घेतला आहे. या सर्व रांगोळीकारांचा मंत्री उदय सामंत आणि मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. समाजोपयोगी काम उदय सामंत फाउंडेशनच्या माध्यमातून केले जातेय याचा अभिमान असल्याचे सामंत म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ रांगोळीकार कृष्णा जाधव, प्रसन्न आंबुलकर, छायाचित्रकार प्रशांत राजीवले, सुनील उर्फ दादा वणजू, राजेश सोहोनी, उदय गोखले, राहुल कळबंटे, सिद्धेश वैद्य, नगरपालिकेचे मुख्यअधिकारी तुषार बाबर, शिवसेनेचे तसेच युवा सेनेचे पदाधिकारी, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. उदय सामंत फाउंडेशनचे महेश सामंत आणि त्यांचे सहकारी सिद्धेश वैद्य, रजनीश परब, प्रथमेश साळवी, पूर्वा पेठे, विद्या विचारे, मानसी साळुंखे, समीर इंदुलकर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.