रत्नागिरी : येथील एका रेल्वे ट्रॅकमनचा मृतदेह शहरानजीकच्या एमआयडीसी येथील रेल्वे ट्रॅकवर आढळला. ही घटना मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी रात्री १२:२० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. संदीप तानाजी लोंढे (४०, रा. कोकण रेल्वे कॉलनी सावित्री बिल्डिंग, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. रेल्वेमध्ये ते ट्रॅकमन म्हणून कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या केली की हा अपघात आहे, याबाबत मात्र अधिक तपशील पुढे आलेला नाही.रेल्वे कर्मचारी प्रफुल्ल मधुकर पवार (४०) यांनी ग्रामीण पोलिस स्थानकात याबाबत खबर दिली. मंगळवारी रात्री ते बंदोबस्त ड्युटी करीत होते. रात्री १२:२० वाजण्याच्या सुमारास ऑन ड्युटी स्टेशन मास्तरांनी त्यांना फोन करून माहिती दिली की, एमआयडीसी भागातील रेल्वे ट्रॅकवर एक व्यक्ती मयत झाली आहे. प्रफुल्ल पवार तातडीने तेथे गेले. त्यांना शरीर एका बाजूला आणि डोके एका बाजूला अशा स्थितीत मृतदेह दिसला.
मृत व्यक्तीच्या बाजूला एक मोबाइल होता. त्याच्या पँटच्या खिशात वेगवेगळ्या बँकांची व पतसंस्थांची पासबुके सापडली. त्यातील एका पासबुकवर त्यांचा फोटो होता. त्या पासबुकवरून त्यांची ओळख पटली आणि त्यांचे नाव संदीप लोंढे असल्याचे समजले. ते रेल्वेमध्येच ट्रॅकमन म्हणून काम करतात.याबाबत प्रफुल्ल पवार यांनी ग्रामीण पोलिसांनी माहिती देताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संदीप लोंढे यांचा अपघात झाला की त्यांनी आत्महत्या केली, ही माहिती अजून पोलिस तपासात पुढे आलेली नाही. रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाचे हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण कोकरे अधिक तपास करीत आहेत.