सेल्फीच्या नादात धबधब्यात बुडालेल्या तरूणाचा ३० तासांनी सापडला मृतदेह
By अरुण आडिवरेकर | Updated: June 2, 2023 14:12 IST2023-06-02T14:02:06+5:302023-06-02T14:12:16+5:30
सौंदळ नजिक ओझरकोंड धबधब्यावर घडली होती दुर्घटना

सेल्फीच्या नादात धबधब्यात बुडालेल्या तरूणाचा ३० तासांनी सापडला मृतदेह
राजापूर : तालुक्यातील सौंदळ नजिक ओझरकोंड धबधब्यावर सेल्फी काढताना पाय घसरून पडल्याने खोल डोहात बुडाल्याची घटना बुधवारी (३१ मे) राेजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली हाेती. निखिल मंगेश मोहिते (१८ रा. सौंदळ भालेकरवाडी, राजापूर) असे तरुणाचे नाव असून, त्याचा मृतदेह तब्बल ३० तासांनी गुरूवारी (१ जून) रात्री ११ वाजता आढळला. आज, शुक्रवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सौंदळ येथील निखिल मंगेश मोहिते आणि त्याचे काही सहकारी मित्र हे परिसर पाहण्यासाठी बुधवारी सायंकाळी बाहेर पडले होते. फिरत फिरत ते सौंदळ नजिक ओझर कोंड येथील धबधब्यावर गेले हाेते. तिथे निखिलला उंचावरुन सेल्फी काढण्याची इच्छा झाली. त्यासाठी उंच खडकावर गेला. सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो खाली धबधब्याच्या खोल डोहात कोसळला.
त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. बुडालेल्या निखिलचा शोध घेण्यासाठी स्कुबा डायव्हरना बाेलावण्यात आले. तहसीलदार शीतल पटेल, पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांनीही घटनास्थळी धाव घेत शोधकार्याचा आढावा घेतला.
आमदार राजन साळवी, शिवसेना तालुकाप्रमुख अशफाक हाजू, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनीही घटनास्थळी भेट दिली. स्थानिक सरपंच, पोलिस पाटील व ग्रामस्थांकडून त्याचा शाेध सुरूच हाेता. अखेर गुरूवारी रात्री ११ वाजता निखिलचा मृतदेह आढळला. ही माहिती पोलिसांनी दिली.