पक्षी सप्ताह विशेष: नीलिमा पक्ष्याची एकाच जागी दुसऱ्या वर्षी वीण!, यंदाचा हंगाम राहिला २६ दिवसांचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:23 IST2025-11-05T17:22:55+5:302025-11-05T17:23:14+5:30
तो भारत, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया या देशात घनदाट झाडी आणि जंगलातही आढळतो

पक्षी सप्ताह विशेष: नीलिमा पक्ष्याची एकाच जागी दुसऱ्या वर्षी वीण!, यंदाचा हंगाम राहिला २६ दिवसांचा
चिपळूण : नीलिमा (Tickell’s Blue Flycatcher) पक्ष्याने पावसाळ्यातील आपल्या विणीच्या यंदाच्या नव्या हंगामासाठी सलग दुसऱ्या वर्षी खेंड (ता. चिपळूण) धीरज वाटेकर यांच्या परसदारातील हॉलच्या खिडकीच्या डाव्या कोपऱ्यावर विश्वास दाखवला होता.
जवळपास पक्षी घरटं बांधताना छद्मवेश (camouflage) धारण करत असतात. अर्थात स्वतःचे खरे स्वरूप लपवत असतात. यावर्षीच्या घराच्या खिडकीत सलग दुसऱ्यांदा नीलिमाचं घरटं बांधून पूर्ण होईपर्यंत या घरट्याबाबत काेणाच्या लक्षात आलं नव्हतं. टिकेल्स ब्लू फ्लायकॅचर हा फ्लायकॅचर कुटुंबातील चिमणीच्या आकाराचा एक छोटासा पक्षी. जेमतेम ६ इंच/१५ सेंमी. लांब आकाराचा असावा. याचे मराठी नाव ‘नीलिमा’ असे आहे. हा पक्षी कीटकभक्षक प्रजाती आहे. तो भारत, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया या देशात घनदाट झाडी आणि जंगलातही आढळतो.
परसदारी यावर्षी पक्ष्याने २६ जून राेजी पहिले अंडे दिल्यावर सलग दोन दिवसात आणखी दोन अंडी दिली. त्यानंतर चौथे अंडे ३० तारखेला दिले. ९ जूनला तीन अंड्यातून तीन पिल्लांनी जन्म घेतला. गेल्यावर्षी नीलिमाने चार पिल्ले दिलेली, यंदा मात्र अंडी चार घातलेली असताना पिल्ले मात्र तीनच जन्मली. एकेक करून २० जूनला तीनही पिल्ले घरट्यातून उडाली.
विणीचा हंगाम २६ दिवसांचा
गतवर्षी २०२४ मध्ये २३ जूनला पहिले अंडे दिले होते. त्याच ठिकाणच्या नव्याने बांधलेल्या घरट्यात मादीने यावर्षी २६ मे राेजी अंडे दिले. नीलिमा पक्ष्याने गतवर्षी १७ जुलैला तर यंदा २० जूनला आपला विणीचा हंगाम पूर्ण केला. या पक्ष्याचा गतवर्षीचा विणीचा हंगाम २५ दिवसांचा होता. यंदाचा हंगाम २६ दिवसांचा राहिला.
खेंडीतील वास्तव्यात मागील १६ वर्षांत विविध छोट्या पक्ष्यांना आपल्या हक्काचा अधिवास-आधार वाटावा असे नैसर्गिक वातावरण निर्माण करण्यात आपण यशस्वी होत असल्याचे ही घटना सांगत होती. आपल्या परसदारावर, इथल्या निसर्गावर आणि आजूबाजूच्या साऱ्या परिसरावर विणीच्या हंगामासाठी पक्ष्यांनी पसंतीची मोहाेर उमटवली होती. - धीरज वाटेकर, पर्यटन अभ्यासक, चिपळूण