पाठ्यपुस्तकांची रद्दी कवडीमोलाने...
By Admin | Updated: April 18, 2015 00:06 IST2015-04-17T22:23:38+5:302015-04-18T00:06:30+5:30
एक वर्षाचे आयुष्य : रद्दीवाल्यांचा धंदा मोठ्या स्वरूपात

पाठ्यपुस्तकांची रद्दी कवडीमोलाने...
रत्नागिरी : विद्येचे आचरण करुन आयुष्य घडविणारी पाठ्यपुस्तके, वह्या शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्याने त्यांची रद्दी कवडीच्या भावात विकली जात आहे. त्यासाठी घरोघरी रद्दीवाले फिरत असून त्यांचा धंदा सध्या तेजीत चालला आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी कचऱ्यातून पैशाची कमाई केली जाते. पोटासाठी झोपडपट्टीत राहणारे अनेक कुटुंबीय कचऱ्यावर आपले जीवन जगत आहेत. त्यासाठी अनेक महिला व पुरुष पहाटे उठून कचराकुंड्या तसेच रस्त्यावर पडलेल्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, पुठे्ठे साठवून त्याची विक्री करतात. त्यावरच शेकडो कुटुंबीयांची गुजराण चालते आहे.
झोपडपट्टीशिवाय उच्चभ्रू वस्तीत राहणारेही भंगारातून मोठी कमाई करीत आहेत. शहर परिसरातून कचरातून साठवून आणलेले प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, पुठ्ठे विकत घेऊन ते मुंबई व अन्य बड्या शहरातील कारखान्यांमध्ये पाठविण्यात येतात. त्यामुळे लाखोंची कमाई करण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी काबाडकष्ट करण्यास ही मंडळी मागे-पुढे पाहत नाहीत, हे विशेष आहे.
मुलांच्या परीक्षा आटोपल्याने अनेक पालक त्यांची पुस्तके, वह्या घरात साठवून न ठेवता ती रद्दी म्हणून काढण्यास सुरूवात केली आहे. शहरातील हजारो रूपये किंमतीची पाठ्यपुस्तके, वह्या किरकोळ किंमतीत किलोवर विकल्या जात आहेत. पाच ते सहा रुपये किलो भावाने ही रद्दी विकण्यात येत आहे. त्यासाठी झोपडपट्टीत राहणारे पुरुष, महिला शहरातील कॉलनी, वाड्यांमध्ये सायकलवरुन फिरुन रद्दी गोळा करत आहेत. पावसाच्या पाण्यापासून तसेच तसेच अन्य कारणाने ती खराब होऊ नयेत यासाठी जीवापाड जपलेली पाठ्यपुस्तके आणि वह्या रद्दीच्या भावात विकल्या जात आहेत. त्यातून दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत आहे. त्यामुळे रद्दी खरेदीच्या व्यवसायाला सध्या तेजी आली आहे.
विद्येचे आचरण करून आयुष्य घडवणारी पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर मात्र कवडीमोलाने रद्दीत विकली जातात. हे चित्र गेले काही दिवस पाहायला मिळत आहे. परीक्षा झाल्यानंतर रद्दीविक्रीची मोठी उलाढाल होते. (शहर वार्ताहर)
कचऱ्यातून पोटाची खळगी भरतात रद्दीवाले.
रद्दीचा व्यवसाय करून ते करतात आपला उदरनिर्वाह.
पाठ्यपुस्तके ५ ते ६ रुपये किलोने विक्री.
मुलांच्या परीक्षा आटोपल्याने आता ही पुस्तके रद्दीत.
कचऱ्यातून जमविलेला पैसा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वापरताहेत.