शिशुविहारकडे कामगारांची पाठच!
By Admin | Updated: July 5, 2016 00:25 IST2016-07-04T21:35:51+5:302016-07-05T00:25:31+5:30
कामगार कल्याण मंडळ : बालकांचा आधार ठरलेल्या केंद्रात प्रवेशच नाही...

शिशुविहारकडे कामगारांची पाठच!
शिरगाव : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ संचलित कामगार कल्याण केंद्र, चिपळूण येथील शिशुविहारच्या दोन वर्गांपैकी एक वर्ग या वर्षीपासून बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेली १२ वर्ष कामगार कुटुंबांसह चिपळूण परिसरातील अनेक बालकांचा आधार ठरलेल्या या केंद्रात प्रवेश न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
कामगार कल्याण निधीची कपात तसेच अंमलबजावणी मोहीम कडक स्वरुपात न राबविल्याने छोटे उद्योग, कंपन्यांमधील अल्पवेतनधारकांना मंडळाच्या लाभाची कल्पनाच नसते. जे कामगार या संज्ञेत येतात त्यांची बालके भविष्यात पहिलीचा प्रवेश डोळ्यासमोर ठेवून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असल्याने या केंद्रातील प्रवेश संख्या घटली आहे. गेल्या १२ वर्षात प्रतिवर्षी सरासरी ८० मुले येथे शिकतात. परंतु, एकूण प्रवेशातील ५० टक्के मुले ही कामगारांचीच हवी, असा नियम आडवा आल्याने दोन वर्ग चालवताना यातील ४० बालके ही कामगार कुटुंबातून आलेली असावीत. मात्र, या नियमाची पूर्तता होत नसल्याने येथील एकच वर्ग सुरु राहणार आहे. यामुळे गरजू बालके प्रवेशापासून वंचित राहणार आहेत.
१७५ रुपये वार्षिक फीमध्ये रोज सकस आहार, आरोग्य तपासणी, गणवेश, वार्षिक सहल याबरोबरच स्वतंत्र शिक्षिका येथील वर्गांसाठी कार्यरत असतात. मात्र, या सुविधा असूनही कामगार कुटुंबियानी या शिशुविहारकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. बालमानसशास्त्राप्रमाणे ४ बाय ४ फूट जागेत एक बालक असेल तरच त्याचे अनुकरणातून शिक्षण व बौध्दिक विकास होतो. तथापि, याबाबत केवळ शासन संचलित शिशुविहार वगळता कोणीही दखल घेत नाही. हजारो रुपयांचे डोनेशन व फी देऊन बालकांना बड्या शाळेत पाठविण्याच्या पालकांच्या मानसिकतेमुळे असे शासकीय उपक्रम बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कामगार कल्याण मंडळ, चिपळूण केंद्राच्या कार्यक्षेत्रात जवळपास ३ हजार ५०० कामगार आहेत. मात्र, येथील शिशुविहारमध्ये कामगारांची ४० बालकेही सध्या दाखल नाहीत. कामगार कल्याण मंडळाच्या विधायक उपक्रमांकडे पाठ फिरवणारे कामगार पाल्याच्या शिष्यवृत्तीबाबतची सर्व कागदपत्रे व सोपस्कर वेळीच पूर्ण करण्यासाठी आग्रही असतात.
कामगारांच्या कल्याणासाठी ५० वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या कामगार कल्याण मंडळ केंद्राला कामगारांचा सकारात्मक प्रतिसाद नसेल तर अल्पदरात चालणारे शिवण, फॅशन डिझाईन, वाचनालय, विविध प्रशिक्षण कार्यक्रम हे क्रमाक्रमाने आपोआपच बंद पडण्याचा धोका आहे. लाभार्थी उपलब्ध नसेल तर बंद होणाऱ्या उपक्रमांना नवसंजीवनी कोण देणार? कामगार कल्याण अधिकाऱ्यांसह कर्मचारीवर्ग तळमळीने हे उपकम बंद होऊ नयेत यासाठी विविध कंपन्यांमधून संपर्क साधत आहे. मात्र, मंडळाकडे आपुलकीने पाहण्याची कामगारांची मानसिकता व कल्याण निधीची कठोर अंमलबजावणीच कामगार कल्याण केंद्राचे अस्तित्व अबाधित ठेवू शकते. (वार्ताहर)
विविध उपक्रम : जनजागृतीची गरज...
कामगारांचा सकारात्मक प्रतिसाद लाभण्यासाठी कामगार कल्याण मंडळाने सुरुवातीपासून जनजागृती करतानाच कामगारांचा विश्वास संपादन केला तरच कामगार कल्याण मंडळाचे अल्पदरात सुरु असलेले विविध उपक्रम सुरु राहतील. अन्यथा ते बंद पडू शकतात, असे मत व्यक्त होत आहे.