रत्नागिरी : सर्व निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील निवडणुकीत स्थानिक पदाधिकारी काय म्हणतील, याचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. २०२४ च्या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळविण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आदेशही त्यांनी दिले.रत्नागिरीमध्ये नगर वाचनालयाच्या सभागृहात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, अतुल काळसेकर, प्रमोद जठार, ॲड. बाबा परुळेकर, उत्तर रत्नागिरी कार्याध्यक्ष केदार साठे, ऐश्वर्या जठार, स्मिता जानकर, सुरेखा खेराडे, मृणाल शेट्ये, संतोष मालप उपस्थित होते.शहराध्यक्ष सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. जिल्हाध्यक्ष पटवर्धन यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि गणपतीची मूर्ती देऊन प्रदेशाध्यक्षांचा सत्कार केला.भारत हा जगातला सर्वोत्कृष्ट देश बनवताना आणि भारताला गतवैभव मिळवून देण्यासाठी, जगाला मानव संसाधने पुरवण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ ते २०३५ या काळासाठी महायज्ञ आयोजित केला आहे. या महायज्ञामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही दररोज २ तास देऊन किमान ८ घरांमध्ये जावे. या तासांत केंद्राच्या योजनांचे दोन लाभार्थींकडून धन्यवाद मोदीजी पत्र घेण्यासह पक्ष संघटन वाढवण्यावर भर द्यावा. जिल्ह्यातून धन्यवादाची पाच लाख पत्रे पंतप्रधानांना पाठवली जातील, असेही आमदार बावनकुळे यांनी सांगितले.प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याने भाजपला नवचैतन्य प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिंदे गटासोबत सन्मानाने युती झाली तर करू. अन्यथा भाजप स्वबळावर लढून विजयी होईल, असे जिल्हाध्यक्ष ॲड. पटवर्धन यांनी सांगितले. आपण सत्ताधारी आहोत. त्यामुळे प्रशासनाकडून गरिबांची कामे करून घ्यायला शिका. महिलेवर अत्याचार झाला तर कोणत्याही आदेशाची वाट न पाहता महिलेच्या मदतीसाठी जा. अत्याचार करणाऱ्यांची कोणतीही गय शिंदे- फडणवीस सरकार करणार नाही, असे चित्रा वाघ यांनी ठणकावून सांगितले.मेळाव्याआधी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये बावनकुळे स्वत: दुचाकी चालवत मारुती मंदिर येथून जयस्तंभापर्यंत गेले. त्यांच्या मागे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उमेश कुळकर्णी बसले होते.या मेळाव्यानंतर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यांनी सावरकर स्मारक आणि कारागृहातील सावरकर यांना ठेवण्यात आलेली कोठडीही पाहिली.काम बघूनच पद देणार१८-२५ वयोगटातील युवा वॉरियर्सची निवड, नवमतदारांची नोंदणी, फ्रेंड्स ऑफ बीजेपी यांची निवड करावी. वर्षभराचा आढावा आपण घेणार आहोत. त्यानंतरच नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करू. आपण प्रत्येक बूथ कमिटीचा आढावा घेणार आहोत, असेही आमदार बावनकुळे यांनी सांगितले.
स्थानिक निवडणुकीतील युतीबाबत स्थानिक पातळीवरच निर्णय घ्या - भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 17:11 IST