महामार्गासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी सुनील तटकरे यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:30 IST2021-03-20T04:30:34+5:302021-03-20T04:30:34+5:30
फोटो ओळी - शेतकरी संघर्ष समिती यांच्यावतीने खासदार सुनील तटकरे यांचे आभार मानताना सभेस उपस्थित समिती सदस्य. ................................... लाेकमत ...

महामार्गासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी सुनील तटकरे यांचा पुढाकार
फोटो ओळी -
शेतकरी संघर्ष समिती यांच्यावतीने खासदार सुनील तटकरे यांचे आभार मानताना सभेस उपस्थित समिती सदस्य.
...................................
लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : मंडणगड तालुक्यात जाणारा राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीडी या महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रायगड रत्नागिरी लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील तटकरे यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी शेतकरी व प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधला जावा, या उद्देशाने गोरेगाव येथील शासकीय विश्रामगृहात सभा आयोजित केली होती.
या सभेला माजी आमदार संजय कदम, माजी सभापती भाई पोस्टुरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मुझ्झफर मुकादम, दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता बांगर, भूमिअभिलेख खात्याच्या सुप्रिया शिंत्रे, शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख रमेश घडवले, कौस्तुभ जोशी, अविनाश दळवी, अस्मिता केंद्रे, सचिन माळी, वैभव कोकाटे, अनंत केंद्रे आदी उपस्थित होते.
जुने व नवीन सीमांकन दाखवण्याची मागणी करत रमेश घडवले यांनी, याबाबत प्रशासन सहकार्य करीत नसल्याची व्यथा मांडली. साठ वर्षांचा कालावधी उलटला असतानाही शेतकऱ्यांच्या जागेतून गेलेल्या रस्त्याची कोणत्याही प्रकारची शेतकऱ्यांच्या सात-बारावर नोंद घालण्यात आलेली नाही, तसेच रस्त्यातील क्षेत्र कमी-जास्त करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असा मुद्दा कौस्तुभ जोशी यांनी मांडला. सचिन माळी यांनी, पाचरळ ते शिरगावदरम्यानच्या गावांचा भूमिअधिग्रहण प्रक्रियेत प्रसिध्द करण्यात आलेल्या थ्री.डी.ची प्रक्रिया चुकीची असल्याचे सांगत, थ्री.ए. प्रसिध्द करण्यापूर्वीच थ्री.बी.ची मोजणी झाल्याचे निदर्शनास आणून दिले. थ्री.बी. मोजणीच्या नोटिसा अनेक शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या नसून सर्वेक्षणातील क्षेत्र व झाडांची संख्या यात विसंगती असल्याचे सांगितले.
यावर खासदार सुनील तटकरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देताना, शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्काळ योग्य कार्यवाही करण्याची सूचना केली. तसेच हरकतदार शेतकऱ्यांच्या जागेची पुनर्मोजणी करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व भूमिअभिलेख विभागाला दिल्या.