Successful fish farming in Chakka Farm | चक्क शेततळ्यात मत्स्य शेती यशस्वी

चक्क शेततळ्यात मत्स्य शेती यशस्वी

ठळक मुद्देचक्क शेततळ्यात मत्स्य शेती यशस्वीपाटपन्हाळेत रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्याच प्रयोगात यश

मंदार गोयथळे

असगोली : गुहागर अथांग समुद्र किनारा लाभला आहे. येथील खाऱ्या पाण्यातील मच्छी सर्वत्र प्रसिद्ध आहे. गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम तेलगडे यांनी आपल्या शेततळ्यामध्ये गोड्या पाण्यात मत्स्य शेती प्रकल्प राबवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असून, पंचायत समितीचे उपसभापती सुनील पवार यांनी या प्रकल्पाला भेट देऊन शेतकरी तुकाराम तेलगडे यांचे कौतुक केले.

तेलगडे यांनी आपल्या जागेमध्ये कृषी विभागाच्या पुढाकाराने मत्स्यशेती प्रकल्प राबवला आहे. समुद्रातील मासे खाणारे खाद्यप्रेमी मोठ्या प्रमाणात आहेत. तसे गोड्या पाण्यातील माशांना ही एक वेगळीच चव असल्याने त्यांनाही स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

मात्र, मागणीनुसार गोड्या पाण्यातील मासे केवळ नदी - नाले, साठवण तलाव यामध्ये मिळत असल्याने मागणीप्रमाणे पुरवठा होऊ शकत नाही. याचा अभ्यास करून तेलगडे यांनी शासनाच्या शेततळे योजनेतून अनुदान घेऊन आपल्या जागेत शेततळे करून घेतले.

शेततळ्यातील पाणी मातीत मुरण्याचा धोका असल्याने पाण्याची बचत करण्यासाठी प्लास्टिकचे आच्छादन केले आहे. त्यामध्ये माशांना आवश्यक असलेले शैवाळयुक्त प्रोटिन्स उपलब्ध केले. सध्या तळ्यात २ हजारहून अधिक मासे आहेत. या माशांना बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. या तळ्याच्या शेजारी त्यांनी अनेक प्रकारच्या भाज्यांची लागवड केली आहे.

त्यांच्या या प्रकल्पाला गुहागर पंचायत समितीचे उपसभापती सुनील पवार यांनी नुकतीच भेट देऊन त्यांचे कौतुक केले. आपल्या या प्रकल्पाचा आदर्श तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे, असे पवार म्हणाले. या प्रकल्पासाठी तुकाराम तेलगडे यांच्यासह त्यांचे कुटुंब मेहनत घेत आहेत.

Web Title: Successful fish farming in Chakka Farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.