शिक्षण उणे, कोकणाला पर्याय फक्त मुंबई, पुणे

By मनोज मुळ्ये | Published: April 25, 2024 06:15 PM2024-04-25T18:15:01+5:302024-04-25T18:15:39+5:30

शिक्षणाच्या खिडक्या उघडल्या, दारे अजूनही बंदच

Students from Konkan still have to go to Mumbai, Pune for education | शिक्षण उणे, कोकणाला पर्याय फक्त मुंबई, पुणे

शिक्षण उणे, कोकणाला पर्याय फक्त मुंबई, पुणे

मनोज मुळ्ये

रत्नागिरी : पारतंत्र्याच्या काळापासून कोकणातशिक्षणाचे वारे वाहत आहे. अनेक समाजसुधारकांनी कोकणात शाळा सुरू केल्या. कदाचित म्हणूनच कोकण बौद्धिकदृष्ट्या संपन्न प्रदेश आहे. अलीकडे उच्च शिक्षणातील काही मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यास सुरुवात झाली असली तरी त्यासाठी पूरक शिक्षण मात्र अजूनही कोकणात रुजलेले नाही. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी मात्र अजूनही कोकणातील विद्यार्थ्यांना मुंबई, पुण्यासारखी महानगरे गाठावी लागत आहेत.

तुकड्या तुकड्यांच्या जमिनीमुळे कोकणातील शेती फायदेशीर होत नाही. एका जमिनीत असंख्य नावे असल्याने पिकवलेले धान्य कोणाच्या वाट्याला येणार, अशी स्थिती. त्यामुळे कोकणी माणसे पोटापाण्यासाठी मुंबईकडे धावली. वर्षानुवर्षे हेच होत गेले. कोकणातील घरटी एकतरी माणूस मुंबईत असतो. स्वत:चा जम बसला की आपले कुटुंब घेऊन जातो आणि तिथलाच होऊन जातो.

मुंबईतील गिरण्या बंद पडेपर्यंत हीच स्थिती होती. गिरण्या बंद पडल्यानंतर काही काळ कारखाने, कंपन्यांमधील नोकऱ्यांसाठी कोकणी माणूस मुंबईकडे जात होता. आता हे प्रमाण काहीसे कमी झाले आहे; पण आता उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

कोकण सतत दुर्लक्षित

कृषी, दळणवळणासह शिक्षणासारख्या प्रत्येक क्षेत्रातच कोकण सातत्याने दुर्लक्षित राहिला आहे. कोकणातील समस्यांबाबत राजकीय पक्ष कधीच एकत्र आले नाहीत. त्यामुळे कोकणातील विकासाला कधी गतीच आली नाही. वर्षानुवर्षे झालेले हे दुर्लक्ष अलीकडच्या काही वर्षांत बदलत आहे. मात्र, अजूनही त्यात खूप मोठी प्रगती आणि अधिक गतीची अपेक्षा आहे.

उच्च शिक्षण होतेय, पण..

वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या सोयी आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध होत आहेत; पण त्यात अजून सुधारणांची गरज आहे, तसेच त्या अभ्यासक्रमांसाठी पूरक शिक्षणाची सुविधा अजूनही कोकणात नाहीत. जेईई, नीट यासारख्या प्रवेश परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शन कोकणात मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोकणाबाहेर धाव घ्यावी लागते. त्यातच कोकणात नोकऱ्यांच्या संधी नसल्याने हे तरुण शिकल्यानंतर परत कोकणात येत नाहीत.

स्वतंत्र विद्यापीठाबाबत कुणालाच आस नाही

  • मुंबई विद्यापीठाच्या नावाचे गारुड मनावर असलेल्या कोकणातील राजकीय नेत्यांना कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाची गरज आहे, असे वाटतच नाही. जे अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात सार्वत्रिक म्हणून शिकवले जातात, तेच येथेही सुरू आहेत.
  • कोकणाच्या गरजांनुसार अभ्यासक्रम सुरू करण्याचा पर्याय मुंबई विद्यापीठ स्वीकारू शकत नाही. कारण त्यांना सर्वांचा विचार करायचा आहे. त्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी स्वतंत्र विद्यापीठ गरजेचे आहे.
  • आता काही महाविद्यालयांनी स्वायत्तता मिळवली आहे. स्वत:चे अभ्यासक्रम ते स्वत: ठरवू शकतात; पण त्यालाही विद्यापीठाच्या चौकटीचे बंधन आहे. त्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ या प्रदेशाच्या गरजांनुसार अभ्याक्रम तयार करू शकते.
  • याला पर्याय म्हणून विद्यापीठाचे उपकेंद्र सक्षम करण्याचा मुद्दा अनेकदा पुढे येतो; पण त्यातून हाती काहीच लागत नाही. थोडे दिवस चर्चा होते आणि नंतर तो विषय बारगळतो. त्यातही उपकेंद्राच्या प्रमुखाला फार मोठे अधिकार नसतात. त्यामुळे त्यातून काहीच बदल होत नाहीत.
  • कोकणात प्रत्येक प्रकल्पाला विरोध केला जातो. येणारा प्रकल्प काय आहे, त्याचे पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक परिणाम काय होतील, यासारखे अभ्यासक्रम अनेक अर्थांनी उपयुक्त ठरू शकतात; पण त्याकडे गांभीर्याने पाहिलेच जात नाही.


उदय सामंत यांचे प्रयत्न, पण..

आधी शिक्षणमंत्री व नंतर पालकमंत्री म्हणून उदय सामंत यांनी रत्नागिरीत काही शैक्षणिक सुधारणा केल्या आहेत. संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र, शासकीय तंत्रनिकेतन पदवी महाविद्यालय रत्नागिरीत सुरू झाले आहे. अनेक वर्षांची मागणी असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयही रत्नागिरीत सुरू झाले आहे. मात्र, त्यात अजून तांत्रिक सुधारणांची, मनुष्यबळाची गरज आहे, तसेच या अभ्याक्रमांसाठी जे पूरक शिक्षण लागते, ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही. त्यासाठी बाहेरच जावे लागते.

Web Title: Students from Konkan still have to go to Mumbai, Pune for education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.