शीळ येथे साठवण टाक्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 11:40 IST2019-04-16T11:36:00+5:302019-04-16T11:40:19+5:30
अवेळच्या पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वाºयाने आंब्याचे झाड कोसळून पाण्याच्या साठवण टाक्यांचे नुकसान झाल्याची घटना शहरानजीकच्या शीळ येथे रविवारी

शीळ येथे साठवण टाक्यांचे नुकसान
राजापूर : अवेळच्या पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वाºयाने आंब्याचे झाड कोसळून पाण्याच्या साठवण टाक्यांचे नुकसान झाल्याची घटना शहरानजीकच्या शीळ येथे रविवारी रात्री घडली. यामध्ये साठवण टाक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यामुळे लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून हवेमध्ये कमालीचा उष्मा वाढला आहे. त्यातून, नैसर्गिक जलस्रोत कमालीचे खालावले आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईची झळ पोहोचत असून, त्या गावांनी पंचायत समिती प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणीही केली आहे. मात्र, अद्याप संबंधित वाडे आणि गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. वाढत्या उष्म्यामध्ये अंगाची लाहीलाही होत असताना गेले दोन दिवस सायंकाळी तालुक्यामध्ये पाऊस पडला.
पावसाच्या जोडीला सोसाट्याचा वाराही होता. त्याचा फटका अनेक आंबा बागायतदारांना बसला. या सोसाट्याच्या वाºयामध्ये शीळ वरची बाईतवाडी येथील पाण्याच्या साठवण टाक्यांवर आंब्याचे झाड कोसळून या टाक्यांचे नुकसान झाले आहे.
शीळ वरची बाईतवाडी ग्रामस्थांनी स्वखर्चाने खासगी नळपाणी योजना राबविली आहे. सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील अर्जुना नदीवरून पाईपलाईन टाकून त्याद्वारे वाडीमध्ये पाणी आणले आहे. नदीवरून पाईपद्वारे आलेल्या पाण्याचा साठा करण्यासाठी दोन टाक्या ठेवण्यात आल्या होत्या. या साठवण टाक्यांवर आंब्याचे झाड पडल्याने टाक्यांचा पूर्णपणे चक्काचूर झाला. त्यामध्ये ग्रामस्थांचे साठ ते सत्तर हजारांचे नुकसान झाले आहे.
सध्या वाढत्या उष्म्यामध्ये पाण्याचे स्रोत खालावले असून, पाणीटंचाईच्या झळा लोकांना पोहोचत आहेत. अशा स्थितीत आंब्याचे झाड कोसळून खासगी नळपाणी योजनेच्या साठवण टाक्यांच्या दुरवस्थेमुळे बाईतवाडीतील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.