भात पेरणीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST2021-05-31T04:23:35+5:302021-05-31T04:23:35+5:30
पालेभाज्यांना मागणी रत्नागिरी : वाढत्या उष्म्यामुळे पालेभाज्यांना मागणी होत आहे. पालक, मुळा, माठ, मेथी, शेपू, कांदापात विक्रीस येत आहे. ...

भात पेरणीला प्रारंभ
पालेभाज्यांना मागणी
रत्नागिरी : वाढत्या उष्म्यामुळे पालेभाज्यांना मागणी होत आहे. पालक, मुळा, माठ, मेथी, शेपू, कांदापात विक्रीस येत आहे. १५ ते २० रुपये जुडी दराने भाज्यांची विक्री होत आहे. वालीच्या शेंगांची जुडी १५ रुपये दराने विकण्यात येत आहे. दुधी भोपळ्यास अधिक मागणी आहे.
खांब बदलण्याची मागणी
रत्नागिरी : शहराबरोबरच ग्रामीण भागातही विजेचे खांब गंजले आहेत. वेळोवेळी मागणी करूनसुध्दा खांब बदलण्यात आलेले नाहीत. पावसाळा तोंडावर असल्याने तत्पूर्वी गंजलेले, सडलेले खांब बदलून अपघात टाळावे, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
कांद्याची आवक मंदावली
रत्नागिरी : पावसाळ्यासाठी कांदा खरेदी करून साठवून ठेवण्यात येतो. मात्र लाॅकडाऊनमुळे कांद्याची आवक वाढली आहे. अन्य जिल्ह्यातील शेतकरी कांदा ट्रक, टेम्पोतून विक्रीला आणत आहेत. २५ ते ३० रुपये किलो दराने कांदा विक्री सुरू आहे. ४० ते ५० किलोची कांदा पिशवी खरेदी करण्यात येत आहे.
रस्त्याची दुरवस्था
रत्नागिरी : शहरातील आझादनगर, कोकणनगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ता पूर्णत: उखडला असून, त्यावरून मार्गक्रमण करणे अवघड बनले आहे. मुख्य रस्त्याची साइडपट्टी दुरुस्त करण्यात आली असली तरी मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.
कॅनिंग व्यवसायात मंदी
रत्नागिरी : आंबा कॅनिंगला सुरुवात झाली तरी यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळे व्यवसायात प्रचंड मंदी आहे. त्यातच ताैक्ते वादळामुळे आंबा जमिनीवर आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वादळातून बचावलेला आंबा शेतकरी काढत असले तरी दरही कमी लाभत आहे. कॅनिंगला येणाऱ्या आंब्यांचे प्रमाण अल्प आहे.
साथींचा प्रादुर्भाव
रत्नागिरी : पाण्याची पातळी खालावल्यामुळे साथींचा प्रादुर्भाव वाढला आहे. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे शरीरातील पाणी कमी होणे त्यामुळे चक्कर येणे, उलटी-जुलाब, तापसरीसारख्या आजारांनी रुग्ण त्रस्त झाले आहेत. कोरोनाचे संकट असल्याने नागरिक उपचारासाठी रुग्णालयात जाणे टाळत आहेत.
कार्यालयांत शुकशुकाट
रत्नागिरी : कोरोनामुळे सध्या शासकीय कार्यालयांत उपस्थितीचे प्रमाण ५० टक्के ठेवण्यात आले आहे. लाॅकडाऊनमुळे अन्य कामांसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे सतत गजबजणाऱ्या शासकीय कार्यालयांत शुकशुकाट जाणवत आहे.
आंबा विक्रीला
रत्नागिरी : बाजारात हापूस विक्रीला असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. अन्य राज्यातील आंबा विक्रीसाठी आला आहे. राघू (लंगडा) बदामी, केसर, लालबाग, दशहरी आदी विविध प्रकारचे आंबे विक्रीला आले असून, किलोवर विक्री होत असल्याने ग्राहकांनाही खरेदीसाठी परवडत आहे.
पालक चिंतित
रत्नागिरी : अद्याप बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक शासनाने जाहीर केलेले नाही. त्यामुळे नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याची वेळ आली तरी अद्याप बारावीचे विद्यार्थी अभ्यासात मग्न आहेत. शासनाने ऑफलाइन परीक्षा घेण्याचे जाहीर केले असले तरी वाढत्या कोरोनामुळे सद्य:स्थितीत तरी परीक्षेचे नियोजन करणे अवघड बनले आहे.