रत्नागिरी : धारधार चाकूने आईचा गळा चिरून स्वत:च्या हाताची नस कापून मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज, मंगळवारी सकाळी रत्नागिरी शहरालगतच्या शांतीनगर परिसरात घडली. पूजा शशिकांत तेली असे मृत्यू झालेल्या आईचे नाव असून, अनिकेत शशिकांत तेली याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वडिलांनी केलेल्या कर्जाला कंटाळून मुलाने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.रत्नागिरी शहराजवळील नाचणे गावातील शांतीनगर परिसरात सकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला ही घटना उघडकीला आल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. रक्तबंबाळ अवस्थेत अनिकेत घराबाहेर येऊन बसला हाेता. त्याच्या शेजारी राहणाऱ्या लाेकांनी त्याला या अवस्थेत पाहिल्यानंतर त्यांनी पाेलिसांना माहिती दिली. त्यानंतर पाेलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पाेलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अनिकेतने आईचा खून केल्याचे पुढे आले.आईचा खून केल्यानंतर अनिकेतने स्वत:च्या हाताची नस कापून स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांनी त्याला तातडीने उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच घटनेचा पंचनामा करुन पूजा तेली यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. अनिकेतचे वडील शशिकांत तेली यांनी सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर अनिकेत आणि त्याची आई पूजा एकटेच राहत होते.
Ratnagiri: कर्जाला कंटाळून आईचा गळा चिरून मुलाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, रत्नागिरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 14:44 IST