Ratnagiri: कधी राजकारण, नियमात अडकले चिपळुणातील प्रकल्प; भवितव्य अजून अंधारातच

By संदीप बांद्रे | Updated: July 18, 2025 14:00 IST2025-07-18T14:00:08+5:302025-07-18T14:00:30+5:30

सर्व कामांमध्ये राजकारण शिरले

Sometimes projects in Chiplun get caught up in politics and regulations | Ratnagiri: कधी राजकारण, नियमात अडकले चिपळुणातील प्रकल्प; भवितव्य अजून अंधारातच

Ratnagiri: कधी राजकारण, नियमात अडकले चिपळुणातील प्रकल्प; भवितव्य अजून अंधारातच

संदीप बांद्रे

चिपळूण : गेल्या २० वर्षांपासून चिपळूण शहरातील विविध प्रकल्पांना अक्षरशः खीळ बसली आहे. नगरपरिषदेने हाती घेतलेले प्रकल्प कधी राजकारण, कधी मूल्यांकन, तर कधी तांत्रिक अडचणींमुळे अर्ध्यावरच अडकले आहेत. महर्षी कर्वे भाजीमंडई, मटण मार्केट, महिला क्रीडा संकुल, पवन तलाव स्टेडियमसारख्या प्रकल्पांना प्रशासकीय कारभारात पूर्ण होण्याची अपेक्षाही आता मावळली आहे.

चिपळूण नगरपरिषदेने २००५ च्या पूरपरिस्थितीनंतर शहरातील काही प्रकल्पांना नव्याने चालना देण्याचा प्रयत्न केला. विशेषतः कोकणातील पहिले बंदिस्त नाट्यगृह म्हणून ओळख असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले. एकीकडे हे काम सुरू असतानाच महर्षी कर्वे भाजी मंडई, मटण मार्केट व मच्छी मार्केट, पवन तलाव स्टेडिअम, नारायण तलाव सुभोभीकरण, महिला क्रीडा संकुल यांसारखी कामे एकाच वेळी सुरू केली. 

मात्र, त्यानंतर या सर्व कामांमध्ये राजकारण शिरले आणि तब्बल १५ वर्षे यातील बहुतांशी प्रकल्प या ना त्या कारणांनी रखडले. त्यातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम वादाच्या भोवऱ्यातच कसेबसे पूर्णत्वाला गेले. मात्र, काम करणाऱ्या ठेकेदाराला बिल अदा झालेले नसल्याने प्रकल्प आजही तितकाच वादग्रस्त राहिला आहे.

शहरातील रावतळे परिसरातील महिला क्रीडा संकुलाच्या बाबतीतही तितकीच उदासीनता पाहायला मिळते. हा प्रकल्प आता प्रशासनाच्या विस्मरणात गेल्याचा प्रकार आहे. शहरातील महिलांसाठी बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारून तेथे बचत गट व महिला संस्थांना सामावून घेण्याचा प्रयत्न होता; परंतु अनेक वर्षे या प्रकल्पाचे काम अर्धवट स्थितीत असून, या इमारतीवर झाडीझुडपे वाढली आहेत.

याच पद्धतीने पवन तलाव स्टेडियमचे कामही वर्षानुवर्षे रखडले आहे. या कामाला अनेकदा चालना देण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यात फारशी प्रगती झालेली नाही. या कामातही लाखो रुपयांचा निधी खर्च करून काम पूर्णत्वाला गेलेले नाही.

Web Title: Sometimes projects in Chiplun get caught up in politics and regulations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.