धनुष्यबाण शिंदेसेनेचाच; राज्यात आमचीच ताकद अधिक : मंत्री सामंत
By मनोज मुळ्ये | Updated: June 17, 2024 19:15 IST2024-06-17T19:12:57+5:302024-06-17T19:15:34+5:30
'शिंदेसेनेने मिळवलेले यश उद्धवसेनेपेक्षा मोठे'

धनुष्यबाण शिंदेसेनेचाच; राज्यात आमचीच ताकद अधिक : मंत्री सामंत
रत्नागिरी : लोकसभा निवडणूक निकालानंतर धनुष्यबाण निशाणीबाबत काही गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र चिन्ह कोणाला द्यावे, याबाबतचे निकष आहेत. त्यासाठी घटना पाहिली जाते. त्यामुळे या चर्चांना कोणताही आधार नाही, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत सांगितले. त्यातही शिंदेसेनेने निवडणुकीत मिळवलेले यश उद्धवसेनेपेक्षा मोठे असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
लोकसभा निवडणुकीत उद्धवसेना अधिक जागा जिंकली आहे, असे सांगत धनुष्यबाण निशाणीबाबत गैरसमज पसरवण्याचे काम काही लोक करत आहेत. मात्र चिन्ह कोणाचे हे ठरवण्याचे निकष वेगळे आहेत, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात शिंदेसेनेचा स्ट्राईक रेट अधिक आहे. शिंदेसेनेने १५ जागा लढवल्या आणि त्यात सातजण वीजयी झाले. उद्धवसेनेने २३ जागा लढवल्या आणि त्यात त्यांचे ९ उमेदवार विजयी झाले. शिंदेसेनेचा स्ट्राईक रेट ४६.६७ टक्के आहे तर उद्धवसेनेचा ४२.६६ टक्के आहे. मतांच्या सरासरीमध्यही शिंदेसेनेला उद्धवसेनेपेक्षा अडीच लाख मते अधिक आहेत.
राज्यात १३ ठिकाणी शिंदेसेना आणि उद्धवसेना आमनेसामने लढत झाली. त्यात ७ ठिकाणी शिंदेसेनेला यश आले आहे. शिंदेसेनेचे सरासरी मताधिक्य १ लाख ६ हजार आहे तर उद्धवसेनेचे सरासरी मताधिक्य ८६ हजार ९४४ आहे. प्रत्येक बाबतीत शिंदेसेनेने उद्धवसेनेला मात दिली आहे. त्यामुळे आता बिनबुडाच्या चर्चा कोणी करु नयेत, असे ते म्हणाले.