The shocking end of a one-month-old girl in Chiplun | धक्कादायक ! चिपळुणात बादलीत बुडून महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू

धक्कादायक ! चिपळुणात बादलीत बुडून महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू

ठळक मुद्दे वहाळ येथील घटना, बादलीत बुडून चिमुकलीचा मृत्यू भारतीय सैनिकाच्या घरातील घटना

चिपळूण : एक महिना चार दिवसांचे आयुष्य लाभलेल्या चिमुकल्या शौर्या प्रवीण खापले हिचा बादलीत बुडून धक्कादायक अंत झाल्याची घटना चिपळूण तालुक्यातील वहाळ येथे घेडले. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजता उघडकीला आली. या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

भारतीय सैन्य दलात सेवेत असलेले प्रवीण बळीराम खापले यांची ती कन्या होती. महिना भरापूर्वीच त्यांना कन्यारत्नेचा लाभ झाला. त्यासाठी ते काही दिवस सुट्टीवरही आले होते. शुक्रवारी त्यांची सुट्टी संपली होती. मात्र त्यांनी आणखी पाच दिवस सुट्टी वाढवून घेतली होती. अशातच ही घटना घडली. प्रवीण खापले हे सकाळी ९ वाजता सावर्डे येथे कामानिमित्त निघून गेले होते. त्यांची पत्नी शिल्पा व प्रवीण यांची आई घरीच होत्या. शेजारच्या दोन मुली धार्मिक कार्यक्रमाचे निमंत्रण सांगण्यासाठी त्यांच्या घरी आल्या होत्या.

त्यांनी चिमुकल्या शौर्याची चौकशी केली. यावेळी बेडरूममध्ये असलेल्या शौर्याला आणण्यासाठी शिल्पा गेल्या होत्या. त्यावेळी ती बेडरूममध्ये दिसली नाही म्हणून शोधाशोध केल्यानंतर बाथरूममधील बादलीत लहान बाळाचे पाय दिसले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता बादलीत बुडालेल्या स्थितीत शौर्या दिसली.

तिला तातडीने उपचारासाठी वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथून तिला डेरवण येथील रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची सावर्डे पोलीस स्थानकात माहिती देण्यात आली असून तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.

Web Title: The shocking end of a one-month-old girl in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.