'केंद्र अन् राज्यातील सरकार हे रिफायनरीचे दलाल'; विनायक राऊतांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 13:36 IST2022-08-21T13:36:23+5:302022-08-21T13:36:42+5:30
सदर प्रकरणावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे.

'केंद्र अन् राज्यातील सरकार हे रिफायनरीचे दलाल'; विनायक राऊतांचा निशाणा
रत्नागिरी- रत्नागिरीतील प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध कायम आहे. रत्नागिरीत रिफायनरी संदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणाची पाहणी करण्यासाठी आलेल्या भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणेंचा ताफा अडवला असून महिलांनी ठिय्या देत याविरोधात निषेध व्यक्त केलाय. रिफायनरीच्या सर्वेक्षणासाठी निलेश राणे बारसू गावात पोहचले. तसेच आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचं निलेश राणे यावेळी म्हटलं आहे.
सदर प्रकरणावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे. केंद्र आणि राज्यातील सरकार हे रिफायनरीचे दलाल आहे. ते रिफायनरीचे समर्थक आहेत. त्यामुळे बारसूत रिफायनरी प्रकल्प राबवण्याचा घाट घालत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच आंदोलकांचं प्रामाणिकपणे म्हणणं ऐकून घेतलं जात नाहीये. सरकारी धाक दाखवण्यात येत असल्याचं विनायक राऊतांनी सांगितलं.
नाणारमध्ये होणारी ऑईल रिफायनरी तिकडे विनाशकारी ठरते, मग आमच्या गावात ती चांगली कशी ठरते, असा सवाल आंदोलकांमधील महिलांनी केला. यावेळी नितेश राणे यांनी तुम्ही जागा ठरवा आपण साऱ्यांनी बसून बोलू असे सांगत विरोधकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. यावेळी निलेश राणे यांनी ग्रामस्थांना आम्हाला थांबवून सांगायचे होते, ते सांगितले आहे. आम्ही एकत्र बसून चर्चा करणार आहोत, ते ठिकाण सांगणार आहेत, असे म्हटले.
निलेश राणे इथे आले आहेत. त्यांच्या समोरच काम सुरु आहे. त्यांनी हे थांबवायला हवे होते, असे आंदोलक महिलांनी म्हटले. बारसू गावच्या महिलांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे. जे काही बोलायचे आहे ते इथेच बोला आम्ही तुम्हाला गावी येऊ देणार नाही, असे या महिलांनी राणेंना ठणकावून सांगितले आहे. यानंतर मध्यस्थी करण्यात आली आणि निलेश राणेंना रस्ता मोकळा करून देण्यात आला.