शिवसेनेची ‘ती’ शाखा कुणाची?, रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील शाखेवरुन नवा वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:18 IST2025-01-29T17:17:58+5:302025-01-29T17:18:24+5:30
रत्नागिरी : उद्धवसेनेचे नवनियुक्त तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी तालुकाप्रमुख पदाचा कारभार हाती घेताच रत्नागिरीतील साळवी स्टाॅप येथील शाखा नेमकी ...

शिवसेनेची ‘ती’ शाखा कुणाची?, रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील शाखेवरुन नवा वाद
रत्नागिरी : उद्धवसेनेचे नवनियुक्त तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी तालुकाप्रमुख पदाचा कारभार हाती घेताच रत्नागिरीतील साळवी स्टाॅप येथील शाखा नेमकी काेणाची, असा वाद निर्माण झाला आहे. याच शाखेतून आपला कारभार सुरू करणार असल्याचे तालुकाप्रमुख घाेसाळे यांनी जाहीर केले आहे. तर, याच ठिकाणाहून शिंदेसेनेत दाखल झालेले प्रदीप साळवी आपला कारभार हाकत आहेत. त्यामुळे आता ही शाखा नेमकी काेणाची, असा वाद रंगला आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जिल्ह्यात नव्या शिलेदारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. उपजिल्हाप्रमुखपदी राजापूरच्या दत्तात्रय कदम यांची वर्णी लागली आहे. रत्नागिरीच्या तालुकाप्रमुखपदी शेखर घोसाळे, तर लांजाच्या तालुकाप्रमुखपदी सुरेश करंबेळे, महिला उपजिल्हा संघटक म्हणून राजापूरच्या उल्का विश्वासराव, महिला तालुका संघटक म्हणून लांजाच्या पूर्वा मुळ्ये यांची नियुक्ती केली आहे.
उद्धवसेनेचे तत्कालीन तालुकाप्रमुख प्रदीप साळवी यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यानंतर या पदावर शेखर घाेसाळे यांची वर्णी लागली आहे. साळवी स्टाॅप येथील शाखेत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारून कामाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतरही प्रदीप साळवी याच शाखेतून कारभार हाकत आहेत. त्यामुळे ही शाखा नेमकी काेणाची, उद्धवसेनेची की, शिंदेसेनेची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
साळवी स्टॉप शिवसेना शाखा ही बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीत स्थापन करण्यात आली आहे. याच शाखेतून शिवसेनेने कारभार चालवला. आता आपण आपल्या कारभाराची सुरुवातही याच शाखेतून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारून करणार आहे. - शेखर घोसाळे, तालुकाप्रमुख, उद्धवसेना
तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी शाखेत यावे, त्यांचे स्वागतच असेल, त्यांनी शुभेच्छाही स्वीकाराव्यात. त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करू. आम्ही दोघं वेगवेगळ्या पक्षात असलो, तरी आमची मन दुभंगलेली नाहीत. - प्रदीप उर्फ बंड्या साळवी, शिंदेसेना