‘राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान’च्या समितीवर किरण धांडोरे यांची निवड

By मेहरून नाकाडे | Published: March 13, 2024 03:46 PM2024-03-13T15:46:40+5:302024-03-13T15:47:11+5:30

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील समिती

Selection of Kiran Dhandore on the committee of Raja Rammohan Roy Library Foundation | ‘राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान’च्या समितीवर किरण धांडोरे यांची निवड

‘राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान’च्या समितीवर किरण धांडोरे यांची निवड

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या मुख्य समितीवर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे ग्रंथपाल किरण धांडोरे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे.

किरण धांडोरे हे गेली २६ वर्षे महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात कार्यरत असून ते ग्रंथालय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, भूगर्भशास्त्रात पदव्युत्तर पदवी, सेट व नेट परीक्षा व पत्रकारिता पदवी उत्तीर्ण आहेत. सध्या ते गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे पीएच.डी. करत असून त्यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रंथालय संचालनालय विभागात ‘ग्रंथालय संचालक’ म्हणून काम पाहिले आहे. या ठिकाणी काम करताना त्यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय ग्रंथालयांचे संगणकीकरणकरून भारत सरकारच्या ई-ग्रंथालय प्रणालीमध्ये समावेश केला.

थोर समाज सेवक राजा राममोहन रॉय यांच्या नावाने राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ही सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकारची मध्यवर्ती स्वायत्त संस्था आहे. केंद्र शासनाने नियुक्त केलेली राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानकरिता सर्वोच्च योजना तयार करणारी एक प्रमुख समिती कार्यान्वित असून या समितीत २२ सदस्य आहेत. यामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ, प्रशासक, ग्रंथपाल आणि वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी यांचा समावेश आहे. गंगापुरम किशन रेड्डी हे केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे मंत्री असून विद्यमान समितीचे अध्यक्ष आहेत.

देशातील विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश यामधील राज्य ग्रंथालय नियोजन समिती मार्फत भारतातील सार्वजनिक ग्रंथालय विकासाबाबत कार्य करणारी प्रमुख समिती आहे. भारतातील सार्वजनिक ग्रंथालयविषयक धोरण ठरवणे, ग्राम ग्रंथालय ते राष्ट्रीय ग्रंथालयापर्यंत उत्कृष्ट ग्रंथालयांची साखळी तयार करणे, भारतातील सर्वाजनिक ग्रंथालयांना आर्थिक मदत करणे, ग्रंथालयांच्या विकासासाठी पूरक असे संशोधन करणे आणि केंद्र सरकारला देशातील ग्रंथालयांच्या विकासाबाबत सल्ला देणे अशी या समितीची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.

या निवडीबद्दल संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी धांडोरे यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Selection of Kiran Dhandore on the committee of Raja Rammohan Roy Library Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.