चिपळूण : शहरातील धामणवणे येथील निवृत्त शिक्षिकेच्या खून प्रकरणातील फरार दुसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात चिपळूण पोलिसांना यश आले आहे. कर्नाटकमधील कलबुर्गी (गुलबर्गा) जिल्ह्यातील कुलगर्गी येथून रविशंकर कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.धामणवणे येथील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा ६ ऑगस्ट राेजी खून झाल्याचे उघड झाले हाेते. याप्रकरणी ट्रॅव्हल एजंट जयेश गोंधळेकर याला ताब्यात घेतले हाेते. त्याच्याकडून या प्रकरणात अन्य एक साथीदार असल्याचे पुढे आले हाेते. मूळ सातारा येथील रविशंकर कांबळे याचा शोध सुरू होता. त्याच्या फोनचे सीडीआर मिळताच तो अनेकदा कर्नाटकमधील काही लोकांच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आले.स्थानिक पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांचे पथक कर्नाटकात गेले. तिथून रविशंकर कांबळे याला ताब्यात घेतले. या प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपी जेरबंद झाले असून, लवकरच चोरी गेलेले दागिने आणि वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले. तपासकामात सहायक पोलिस निरीक्षक ओम आगाव यांनी भूमिका बजावली.
एसटी तिकिटावरील मोबाइलमुळे सुगावावर्षा जोशी यांच्या मृतदेहाशेजारी एसटीचे एक तिकीट मिळून आले. त्या तिकिटावर ट्रॅव्हल एजंट जयेश गोंधळेकर याचा नंबर लिहिलेला होता. तसेच कॅलेंडरवरही काही रिक्षाचालक, दूधवाला व अन्य काही मोबाइल नंबर लिहिलेले होते. तिकिटावरील मोबाइल नंबरवरून जयेश गोंधळेकरची चौकशी केली. तसेच खुनाच्या दिवशी त्याच्या मोबाइलचे लोकेशन वर्षा जोशी यांच्या घर परिसरात मिळत होते. त्यातून पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला आणि त्यातून या घटनेचा तपास लागला.
सासूरवाडीतच सापडलाकलबुर्गी (गुलबर्गा) जिल्ह्यातील कुलगर्गी ही रविशंकर कांबळे याची सासरवाडी आहे. त्यामुळे पोलिसांनी तेथे जाऊन शोध घेतला. मात्र, तो सापडत नव्हता. सासरवाडीमध्ये त्याची पत्नी आणि मेहुणा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी कांबळे याचा पत्ता मिळवला आणि त्याला ताब्यात घेतले.