चिपळुणातील ८ अनधिकृत खोक्यांना सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 14:39 IST2020-11-21T14:37:32+5:302020-11-21T14:39:33+5:30
chiplun nagrparishad, muncipaltycarportaion, ratnagirinews एक दिवसाच्या विश्रांतीनंतर नगर परिषद प्रशासन शुक्रवारी चांगलेच आक्रमक झाले. दुपारनंतर धडक कारवाईला सुरुवात करत शहरातील ८ अनधिकृत खोके सील केले. यामध्ये माजी नगरसेवक रमेश खळे यांच्या दोन गाळ्यांचाही समावेश आहे. काहींना दोन दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्यांनी स्वतःहून खोके बाजूला केले नाहीत तर जप्तीची थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

चिपळुणातील ८ अनधिकृत खोक्यांना सील
चिपळूण : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर नगर परिषद प्रशासन शुक्रवारी चांगलेच आक्रमक झाले. दुपारनंतर धडक कारवाईला सुरुवात करत शहरातील ८ अनधिकृत खोके सील केले. यामध्ये माजी नगरसेवक रमेश खळे यांच्या दोन गाळ्यांचाही समावेश आहे. काहींना दोन दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्यांनी स्वतःहून खोके बाजूला केले नाहीत तर जप्तीची थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
येथील नगर परिषद प्रशासनाने मंगळवारपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आणि शहरातील शेकडो हातगाडी, खोके व शेड उद्ध्वस्त केल्या. माजी नगरसेवक रमेश खळे यांनी कारवाईला विरोध करत आत्महत्येचा इशारा दिला. त्यामुळे मोठा गोंधळ झाला. परंतु संध्याकाळी प्रशासनाने पुन्हा त्यांच्या गाळ्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आणि आतील सामान बाहेर काढले. मात्र, स्वतः हे खोके बाजूला करून देतो, असे खळे यांनी सांगितल्याने प्रशासनाने खळे यांना मुदत दिली होती.
शुक्रवारी प्रशासनाने पुन्हा खळे यांच्यावर कारवाई करत गाळे सील केले. त्याशिवाय खडस शॉपिंग मॉल परिसर व विजय मेडिकल परिसरात कारवाई केली. तेथील सलगर टी शॉपला एक दिवसाची मुदत देण्यात आली. मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, प्रमोद ठसाळे, अतिक्रमण हटाव पथकाचे संदेश टोपरे, स्वछता विभागाचे वैभव निवाते, राजू खातू आणि कर्मचाऱ्यांनी ही धडक कारवाई सुरू ठेवली होती.
रमेश खळे न्यायालयात
पालिकेने केलेल्या कारवाई विरोधात माजी नगरसेवक रमेश खळे यांनी थेट न्यायालयात धाव घेतली असून, न्यायालयाने चिपळूण पालिकेकडून अहवाल मागवला आहे. आता सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे.