१ तारखेला पगार होईना
By Admin | Updated: December 5, 2015 00:24 IST2015-12-04T22:30:42+5:302015-12-05T00:24:13+5:30
शिक्षकांमध्ये नाराजी : शासन निर्णयाला अजूनही हरताळच

१ तारखेला पगार होईना
आनंद त्रिपाठी -- वाटूळ--राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय शिक्षकांचे वेतन एक तारखेला जमा करावे असा शासन निर्णय होऊन तीन महिने उलटले. १ तारखेला पगार न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देशही परिपत्रकामध्ये आहेत. परंतु, रत्नागिरी जिल्ह््यात शहरी भागातील काही शाळा सोडल्या तर अनेक शाळांमधील वेतन हे ५ किंवा ६ तारखेला होत असल्याने शासनाच्या परिपत्रकालाच हरताळ फासला जात आहे.शासनाकडून कोषागार कार्यालयाकडे वेळेत बिले सादर केली जात असून, १ तारखेलाच प्रत्येक विभागातील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये आॅनलाईन वेतनाची रक्कम गेले तीन महिने जमा होत आहे. परंतु, संबंधित शाळेतील शिक्षकांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास ५ ते ६ दिवसांचा कालावधी लागत असल्याने १ तारखेला जमा झालेली पगाराची रक्कम कर्मचाऱ्यांना ५ किंवा ६ तारखेला मिळत आहे. या विलंबाला केवळ जिल्हा मध्यवर्ती बँक हीच कारणीभूत असल्याने जिल्ह््यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेमार्फत व्हावे, अशी मागणी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष रमेश जाधव यांनी केली आहे.शासनाने केवळ निर्णय घेतला मात्र त्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्षच केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
वेतनाची रक्कम ही आॅनलाईन जमा होते. परंतु, प्रत्येक शाळेची पे बिले जिल्हा बँकेच्या प्रधान शाखेतून पोष्टाने संबंधित सर्व शाखांना पाठवली जात असल्याने ही पे बिले मिळेपर्यंत खात्यावरील जमा रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करता येत नसल्याने पगाराला विलंब होत आहेत. जर टपालाद्वारेच पे बिले पाठवली जात असतील तर मग आॅनलाईन प्रक्रियेचा उपयोग काय? असा सवाल शिक्षकवर्गातून केला जात आहे.
जिल्हा बँक जबाबदार : पाच तारखेनंतरच वेतन
१ तारखेला वेतनाची रक्कम जमा होऊनदेखील कर्मचाऱ्यांना ५ तारखेनंतरच वेतन मिळत आहे. हे वेतन विलंबाने मिळण्याला जिल्हा बँक जबाबदार आहे. यासाठी पे बिले जिल्हा बँकेच्या संबंधित शाखांमध्ये १ तारखेला कशी जमा होतील याबाबत नियोजन होणे आवश्यक आहे.
- रमेश जाधव, जिल्हाध्यक्ष, शिक्षक परिषद
गांभीर्यच नाही
रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न गेले कित्येक दिवस तसाच प्रलंबित आहे. मध्यंतरी तर हा प्रश्न खूपच गंभीर बनला होता. मात्र, त्याकडे अद्यापही गांभीर्याने पाहिले नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा बँकेमुळे शिक्षकांना वेतन मिळण्यास विलंब.
राष्ट्रीयकृत बँकेमध्येच वेतन मिळावे, शिक्षक परिषदेने केली मागणी.