साखरी नाटे जेटीसाठी ११८ कोटी मंजूर, काम सुरू; मत्स्य व्यवसायाला मिळणार नवसंजीवनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:31 IST2025-02-10T16:30:21+5:302025-02-10T16:31:13+5:30
राजापूर : तालुक्यातील साखरी नाटे येथे मत्स्य बंदर व्हावे अशी येथील मच्छीमार बांधवांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ती मान्य ...

साखरी नाटे जेटीसाठी ११८ कोटी मंजूर, काम सुरू; मत्स्य व्यवसायाला मिळणार नवसंजीवनी
राजापूर : तालुक्यातील साखरी नाटे येथे मत्स्य बंदर व्हावे अशी येथील मच्छीमार बांधवांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ती मान्य होऊन शासनाने नाबार्डअंतर्गत ११८ कोटी रुपये निधी मंजूर करून साखरी नाटे जेटीला मान्यता दिली आहे. आता या जेटीचे काम सुरू झाले असून, विविध सुविधांनी सुसज्ज अशी ही जेटी होणार आहे. यामुळे परिसरातील मत्स्य व्यवसायाला नवसंजीवनी मिळणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दोन नंबरचे बंदर म्हणून साखरी नाटे गावाची ओळख आहे. पर्ससीननेट मासेमारीसह, पारंपरिक पद्धतीनेही येथे मासेमारी केली जाते. येथील मच्छीमारांना आणि मच्छी विक्रेत्यांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी धाऊलवल्ली-साखरी नाटे-आंबोळगड या संपूर्ण सागरी पट्ट्यामध्ये भव्य अशी मच्छीमार जेटी म्हणजेच बंदर मंजूर करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार साखरी नाटे येथील नियोजित बंदराच्या कामांमध्ये मच्छीमारांसाठी जाळे विणण्यासाठी शेड, संरक्षक भिंत, स्लीपिंग सॉफ्ट, बीच लँडिंग, मासळी लिलाव गृह, मत्स्य नौका दुरुस्तीसाठी लागणारी गीअर शेड, प्रशासकीय इमारत, उपाहारगृह, विश्रांती गृह, बोट दुरुस्तीसाठी कव्हर शेड, रेडिओ कम्युनिकेशन सेंटर, स्वच्छतागृह ३, चौकीदार कक्ष, पार्किंग एरिया, संपूर्ण जेटी परिसरात दिव्यांची व्यवस्था, पाणी योजना, सांडपाणी निचरा व प्रक्रिया व्यवस्था, अग्निशामक व्यवस्था, अशी कामे करण्यात येणार आहेत. खाडीपात्रात गाळही काढला जाणार आहे.
याठिकाणी तीन जेटी, रेडिओ टॉवर, मासे उतरवण्यासाठी ७४० मीटरची जेटी, जाळे विणण्यासाठी सुविधा याचा समावेश आहे. साखरी नाटे बंदरासाठी जवळपास १५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यातील प्रत्यक्ष रक्कम ११८ कोटी रुपये या प्रत्यक्ष जेटीच्या कामासाठी खर्ची केले जाणार आहेत.
सीआरझेडचीही मान्यता
या जेटीचा आराखडा मत्स्य विभागाने केला असून, कामाची जबाबदारी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडे देण्यात आली आहे. जेटी करता आवश्यक असलेली सीआरझेडची मान्यताही मिळाली आहे.