लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : परजिल्ह्यातून कांदा, बटाटे, लसणासह कडधान्य, डाळींची आवक होत आहे. लाॅकडाऊन सुरू असल्याने परजिल्ह्यातून येणारी आवक घटली आहे. त्यामुळे दरातील वाढ सुरूच आहे. बेगमीसाठी कांदा, बटाटा, डाळी, कडधान्ये खरेदी करण्यात येतात. मात्र, दर कडाडल्याने खरेदीवर परिणाम झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भडकलेल्या दरामुळे तेलाचे दरही कडाडले आहेत. १७० ते १७५ रुपये लिटर दराने तेल विक्री सुरू असल्याने तेल वापर ग्राहकांनी कमी केला आहे. कडधान्य, डाळी, तांदूळ, गव्हाच्या किमतीत चढउतार सुरूच आहे. कांदा २० ते ३० रुपये तर बटाट्याची २५ ते ३० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या कामामुळे पावसाळ्यातील चार महिने खरेदीसाठी जाणे अशक्य असल्याने एकदाच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली जाते. वाढत्या दरामुळे बजेटनुसारच किंबहुना गरजेपुरते लागणारे साहित्य खरेदी केले जात आहे.
गत दीड वर्षापासून साखरेचे भाव मात्र नियंत्रित आहेत. ३२ ते ३५ रुपये किलो दराने साखर विक्री सुरू आहे. किरकोळ विक्री मात्र ३७ रुपये दराने सुरू आहे. पावसाळ्यासाठी साखर खरेदी करण्यात येत आहे. साखरेबरोबर गुळाचेही दर स्थिर आहेत. ३० ते ३२ रुपये किलो दराने गूळ विक्री सुरू आहे. साखरेपेक्षा गुळाचा वापर कमी आहे.
उष्म्यामुळे हैराण झाल्यावर प्राधान्याने लिंबू-पाणी सेवन नागरिक करीत आहेत. ‘क’ जीवनसत्व मुबलक असल्याने लिंबू सेवनाने कसर भरून काढली जाते. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबू सेवन आवर्जून केले जात आहे.
दैनंदिन स्वयंपाकात कांद्यापाठोपाठ बटाट्याचा वापर सर्रास केला जातो. २५ ते ३० रुपये किलो दराने बटाट्याची विक्री सुरू आहे. पावसाळ्यासाठी बटाटा खरेदी सुरू असून, टिकावू बटाटा खरेदी केला जातो. बटाट्याला अंकुर येत असल्याने खरेदीवर नियंत्रण आहे.
पावसाळा तोंडावर आहे. लाॅकडाऊन सुरू असल्याने जीवनावश्यक वस्तूंची फारशी आवक होत नसल्याने दरात वाढ झाली आहे. ग्राहकांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंची उपलब्धता सवलतीच्या दरात करावी.
- अविना पांचाळ, गृहिणी
दरवाढीमुळे दैनंदिन स्वयंपाकच महागला आहे. कुठे खर्च व कुठे नियंत्रण, असा प्रश्न सद्य:स्थितीत निर्माण होत आहे. शासनाने यावर योग्य निर्बंध सुरू करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
- दीपा पवार, गृहिणी