संगमेश्वर तालुक्यात भात कापणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 16:18 IST2017-10-27T16:16:31+5:302017-10-27T16:18:09+5:30
संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी भातकापणीला प्रारंभ केला होता. मात्र, आता परतीचा पाऊस गायब झाल्याने बळीराजा सुखावला असून, तयार झालेले भातपीक घरात आणण्यावर शेतकरी भर देत आहे. त्यामुळे तालुक्यात भातकापणीला वेग आला आहे.

संगमेश्वर तालुक्यात भात कापणीला वेग
देवरूख , दि. २७ : संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी भातकापणीला प्रारंभ केला होता. मात्र, आता परतीचा पाऊस गायब झाल्याने बळीराजा सुखावला असून, तयार झालेले भातपीक घरात आणण्यावर शेतकरी भर देत आहे. त्यामुळे तालुक्यात भातकापणीला वेग आला असून, शेतकरी भातकापणीत मग्न असल्याचे पाहावयास मिळत आहे.
तालुक्यातील बहुतांशी ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे येथील जनता शेतीवरच अवलंबून असून, या आधारे ते आपली गुजराण करतात. यावर्षीही तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी भातशेती केली आहे. मात्र, भातपीक तयार होत असतानाच तालुक्यात मुसळधार पावसाने जोर धरत तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले होते.
हा पाऊस तालुक्यात सतत पडत असल्यामुळे त्याचा फटका भातशेतीला बसला होता. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून नेतो की काय? या विवंचनेत बळीराजा सापडला होता. अनेक ठिकाणी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले.
एकीकडे भातपीक कापणीयोग्य होत असतानाच दुसरीकडे मुसळधार पाऊस पडत असल्याने तयार झालेले भातपीक कापायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. संगमेश्वर तालुक्यात सद्यस्थितीत दुपारच्या वेळेत प्रचंड उकाडा जाणवत असल्याने सकाळच्या वेळेतच शेतकरी भातपिकाची कापणी करीत आहेत. तर काही ठिकाणी उन्हाची तमा न बाळगता शेतकरी भातकापणीत दंग असल्याचे दिसून येत आहे.